कोरोना उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:11+5:302021-04-02T04:25:11+5:30

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व अंमलबजावणीबाबत तालुकास्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत ...

District administration alert mode for corona measures | कोरोना उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

कोरोना उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

Next

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व अंमलबजावणीबाबत तालुकास्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व विभागांना तातडीने यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत झालेल्या जिल्हास्तरीय कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अ. मा. पोळ उपस्थित होते.

या समितीमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांचा समावेश असेल. तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक करण्यात येणाऱ्या उपाययोजना, नियोजन आणि अंमलबजावणी याबाबतची जबाबदारी या समितीवर असणार आहे.

यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. डी. शेळके, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस. एस. घुणकीकर, तहसीलदार अर्चना कापसे, नायब तहसीलदार डॉ. अर्चना कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी संजय राजमाने, महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी वर्षा परीट, सहायक संचालक दीपक शिंदे, संजय शिंदे, राहुल कदम, डॉ. अशोक पोळ उपस्थित होते.

ऑक्सिजनचा पुरेसा साठा ठेवावा

मागीलवर्षीचा अनुभव पाहता, सरासरी ऑक्सिजनचा किती पुरवठा होतो, याबाबत सर्वांनी तयारी ठेवावी. नगरपालिकानिहाय असणारी कोविड उपचार करणारी खासगी रुग्णालयाबाबतची माहिती तयार ठेवावी. महापालिकेने शहरातील नियोजन करून सर्व यंत्रणा सतर्क ठेवावी. शेंडा पार्क, संजय घोडावत विद्यापीठ, आय. जी. एम. सीपीआर येथील ऑक्सिजन टँकमध्ये साठा ठेवावा.

रुग्णालयांसाठी लेखाधिकारी नियुक्त करा

खासगी रुग्णालयांची देयके तपासणीसाठी लेखाधिकारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण द्यावे. प्रत्येक लेखाधिकाऱ्यांनी स्वतंत्र नोंदणी पुस्तक ठेवावे. त्यामध्ये रुग्णालयाने दिलेले देयक, त्याबाबत करण्यात आलेले परीक्षण, अंतिम देयक याबाबतच्या नोंदी ठेवाव्यात. याबरोबरच बेड उपलब्धतेसाठी प्रत्येक रुग्णालयासाठी एक संपर्क अधिकारी नियुक्त करावा. महापालिका क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत लेखाधिकारी नियुक्त करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

खासगी रुग्णालयांनी हॉटेलसोबत समन्वय ठेवावा

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी आतापासूनच तयारी ठेवून संबंधित हॉटेलसोबत समन्वय ठेवावा. मागील अनुभव पाहता, आतापासूनच सतर्क राहून तयारी करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालय आणि हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत दिली. यावेळी महापालिका उपायुक्त निखिल मोरे, ॲस्टर आधारचे डॉ. अजय केणी, डॉ. गीता पिल्लाई, डॉ. सुज्ज्ञा दिवाणी यांच्यासह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

अग्निशमनरोधक यंत्रणा तयार ठेवा

उपचारांच्या ठिकाणी आगीची दुर्घटना घडणार नाही, याबाबत सर्व यंत्रणांनी अग्निशमनरोधक यंत्रणाबाबत गांभीर्याने तयारी ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, महावितरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आणि महापालिकेचे अग्निशमन दल या सर्वांनी समन्वयाने काळजीपूर्वक फायर तसेच इलेक्ट्रिक ऑडिटबाबत पूर्तता करावी. सीपीआर प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी सीपीआर, आयजीएम, इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज याबाबतही आढावा घेतला. बैठकीस कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. विजय बर्गे, चिफ फायर ऑफिसर रणजित चिले, डॉ. आर. आर. शेटे, प्रसाद संकपाळ उपस्थित होते.

एचआरसीटीसोबतच आरटीपीसीआरला स्वॅब द्या

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे एचआरसीटीसाठी आलेल्या रुग्णांनी आरटीपीसआरसाठी स्वॅब द्यावा. त्याचबरोबर इली, सारी संशयित रुग्णांचाही स्वॅब घ्यावा. याबाबत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना पत्र पाठवावे, अशी सूचना टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी डॉ. विजय बर्गे, डॉ. अनिता सैब्बनावर उपस्थित होत्या.

---

फोटो नं ०१०४२०२१-कोल-कोरोना आढावा बैठक

ओळ : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी डॉक्टरांसह विविध विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, डॉ. योगेश साळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

--

Web Title: District administration alert mode for corona measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.