Coronavirus Unlock : पाचव्या दिवशीही जिल्ह्यात लॉकडाऊनला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:13 PM2020-07-24T17:13:08+5:302020-07-24T17:15:27+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करीत घराबाहेर पडणे टाळले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करीत घराबाहेर पडणे टाळले आहे.
कोल्हापुरातील कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी (दि. २०) पासून जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. गेले पाच दिवस जिल्ह्यात त्याची कडक अंमलबजावणी होत आहे.
एरव्ही गर्दीने फुलून गेलेले रस्ते, चौक दिवसरात्र निर्मनुष्य दिसत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कोणी घराबाहेर पडताना दिसत नाही. शहरात चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी केली जाते. ग्रामीण भागातही गरज असली तरच लोक घराबाहेर पडतात.
लॉकडाऊन वाढविल्याची चर्चा?
लॉकडाऊनचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. प्रशासनाने रविवार (दि. २६) पर्यंत लॉकडाऊन केले आहे. त्यानंतरही आणखी आठवडाभर लॉकडाऊन वाढवल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. याबाबत प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांत शुक्रवारी दिवसभर चौकशी केली जात होती.