हद्दवाढ बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष
By admin | Published: August 1, 2016 12:49 AM2016-08-01T00:49:44+5:302016-08-01T00:49:44+5:30
मुंबईत आज संयुक्त बैठक : मुख्यमंत्री करणार समर्थक-विरोधकांशी चर्चा
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबईत आज, सोमवारी दुपारी दोन वाजता हद्दवाढ समर्थक आणि विरोधक यांची बैठक होणार आहे. यात संबंधित दोन्ही घटकांची बाजू ऐकून घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागांसह राजकीय प्रतिष्ठेच्या बनलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
हद्दवाढीबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे गेली ४० वर्षे रखडलेली हद्दवाढ होण्याबाबत कोणत्याही क्षणी अधिसूचना निघण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, हद्दवाढीत प्रस्तावित १८ गावांतील ग्रामस्थ आणि आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी हद्दवाढीला प्रखर विरोध दर्शविला. शिवाय संबंधित १८ गावांनी बंद पाळून आपली भावना व्यक्त केली. तसेच हद्दवाढीच्या समर्थनार्थ मुंबईत आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या उपोषणाच्या विरोधात तीन आमदारांनी उपोषण केल्याने परिस्थिती चिघळली.
त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी हद्दवाढीला स्थगिती देऊन हद्दवाढ समर्थक आणि विरोधक यांची बैठक मुंबईत घेण्याचे ठरले. त्यानुसार विधानभवनात संबंधित बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात आज, सोमवारी दुपारी दोन वाजता होणार आहे. या बैठकीस सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीतर्फे आमदार राजेश क्षीरसागर, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, माजी महापौर आर. के. पोवार, प्रल्हाद चव्हाण, बाबा पार्टे, राष्ट्रवादीचे राजेश लाटकर, भाजपचे रामभाऊ चव्हाण, महेश जाधव, शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान, आदी उपस्थित राहणार आहेत.
हद्दवाढीच्या विरोधातील आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, माजी
आमदार संपतराव पवार-पाटील, हद्दवाढ विरोधी सर्वपक्षीय कृती समितीचे प्रवक्ते नाथाजी पोवार, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, एस. आर. पाटील, भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, महेश चव्हाण, राजू माने, आदी उपस्थित राहणार आहेत.
हद्दवाढ समर्थक उद्धव ठाकरे यांना भेटणार
हद्दवाढ समर्थक हे एकत्रितपणे सोमवारी सकाळी दहा वाजता ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
यावेळी त्यांना हे समर्थक हद्दवाढ होण्याबाबतचे लेखी निवेदन देणार आहेत, शिवाय हद्दवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची विनंती ते पक्षप्रमुख ठाकरे यांना करणार आहेत.
रविवारी रात्री रवाना झाले...
कोल्हापूर हद्दवाढप्रश्नी आज, सोमवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी रविवारी रात्री महापौर अश्विनी रामाणे, हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक व माजी महापौर आर. के.पोवार रवाना झाले. त्याचबरोबर माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, शिवसेनेचे गटनेते नियाज खान यांच्यासह नगरसेवक विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, बाबा पार्टे, राजेश लाटकर, रामभाऊ चव्हाण, अॅड. महादेवराव आडगुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, पद्माकर कापसे, किशोर घाटगे, आदींसह विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते रवाना झाले.
शहराच्या विकासासाठी हद्दवाढ हा एकच पर्याय नाही. हद्दवाढीमुळे १८ गावांना मोठा फटका बसणार आहे. याबाबतची ग्रामीण भागातील जनतेची वास्तववादी भूमिका बैठकीत मांडणार आहे.
- नाथाजी पोवार, निमंत्रक, हद्दवाढ विरोधी सर्वपक्षीय कृती समिती
हद्दवाढीअभावी कोल्हापूर शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, ही भूमिका आम्ही बैठकीत मांडणार आहोत.
- आर. के. पोवार, निमंत्रक, सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समिती