जिल्हा बँक पुन्हा तोट्यात
By admin | Published: September 17, 2015 01:12 AM2015-09-17T01:12:43+5:302015-09-17T01:12:43+5:30
उत्पन्नापेक्षा खर्चच जादा : संचित तोटाही वाढला
राजाराम लोंढे / कोल्हापूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१४-१५ या आर्थिक वर्षात ८ कोटी ४४ लाखांचा तोटा झाला आहे. उत्पन्नापेक्षा बँकेचा खर्च अधिक झाला, त्याचबरोबर ‘एनपीए’मध्ये असणाऱ्या खात्यांमध्ये फिरवाफिरवी करता आली नसल्यानेच त्याचा परिणाम ताळेबंदावर दिसत आहे. बँकेकडून एकूण कर्ज वाटपाच्या ५२ टक्के पीक कर्जाचे वाटप होते, हे जरी खरे असले तरी व्याज खर्च, न्यायालयीन खर्चासह इतर खर्चांत झालेल्या वाढीमुळे तोटा झाला आहे.
जिल्ह्याची अर्थवाहिनी २००६ पासून कमकुवत होत गेली. प्रशासकांनी बँकेला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, ‘दत्त-आसुर्ले’वगळता बड्या थकबाकीदारांकडून वसूल करण्यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यामुळे बँकेचा ताळेबंद सुदृढ होण्यावर मर्यादा आल्या. २०११-१२ ला ७९६ कोटी निव्वळ नफा ताळेबंदात दिसत आहे.
या आर्थिक वर्षात ११२ कोटी अपात्र कर्जमाफी जमा-खर्चाबरोबर लहान थकबाकीदारांकडून वसुलीही चांगली झाली होती. २०१२-१३ ला ‘दत्त-आसुर्ले’ची विक्री झाल्याने या आर्थिक वर्षात १४६ कोटी नफा दिसतो. २०१३-१४ ला कर्जाचे हप्ते पाडून दिल्याने हा नफा ९ कोटींवर आला. २०१४-१५ मात्र बँकेची खरी आर्थिक स्थिती समोर आली. या आर्थिक वर्षात ८ कोटी ४४ लाखांचा तोटा ताळेबंदाला दिसतो.
गतवर्षीच्या तुलनेत व्याज खर्चात २३ कोटी, वकील फीमध्ये ११ लाख, छपाई, सादिलवारमध्ये ५ लाख, व्याज सवलतमध्ये ५ लाख, तर संशयित बुडीत कर्जनिधीमध्ये १ कोटी १९ लाखाने वाढ झाली आहे.