‘दौलत’साठी जिल्हा बँकेची पुन्हा धडपड
By admin | Published: April 12, 2016 12:57 AM2016-04-12T00:57:51+5:302016-04-12T00:58:35+5:30
सातव्यांदा निविदा प्रसिद्ध : १२ ते २२ एप्रिलपर्यंत निविदा विक्री
कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गळ्याभोवती अडकलेला तिढा सोडविण्यासाठी जिल्हा बॅँकेने पुन्हा धडपड सुरू केली आहे. भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्याची सातव्यांदा निविदा प्रसिद्ध केली असून, १२ ते २२ एप्रिलपर्यंत निविदा फॉर्मची विक्री केली जाणार आहे. २५ एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत परिपूर्ण निविदा स्वीकारल्या जाणार असून, त्याच दिवशी दुपारी चार वाजता निविदा उघडल्या जाणार आहेत.
‘दौलत’ कारखान्याकडे जिल्हा बॅँकेची ६७ कोटी २७ लाख थकबाकी आहे. या थकबाकीपोटी बॅँकेने आतापर्यंत सहावेळा भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी, तर दोन वेळा विक्रीची निविदा प्रसिद्ध केली होती. पण, बॅँकेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ‘दौलत’चा फास जिल्हा बॅँकेच्या भोवती आवळत चालला आहे. कोणत्याही परिस्थितीत ‘दौलत’ची वसुली होणे गरजेचे आहे. यासाठी बॅँकेने धडपड सुरू केली
आहे.
बॅँकेच्या अटी :
मालमत्ता जशी आहे, जी आहे, जिथे आहे, तशी चालविण्यास द्यायची आहे.
बॅँकेच्या थकबाकीपैकी ५० टक्केरक्कम दोन आठवड्यांत देणे, उर्वरित रक्कम चार / पाच वार्षिक समान हप्त्यांत बॅँक गॅरंटीसह देणे.
एन.सी.डी.सी., एस.डी.एफ, शासकीय देणी, कामगार देणी, आदी निविदाधारकांनी देण्याचे असून, त्याचा आराखडा सादर करायचा आहे.