जिल्हा बँकेकडून ४१४ कोटी खरीप पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:16+5:302021-06-06T04:18:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : खरीप पेरणीबरोबर पीककर्ज उचलण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. जिल्हा बँकेकडून ६३ हजार ५०० शेतकऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खरीप पेरणीबरोबर पीककर्ज उचलण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. जिल्हा बँकेकडून ६३ हजार ५०० शेतकऱ्यांनी आतापर्यंत ४१४ कोटी ५६ लाख रुपये पीक कर्जाची उचल केली आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण बँकांचा मात्र कर्ज वाटपात अद्याप हात आखडताच दिसत आहे.
केंद्र सरकार नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पीककर्ज देते. नाबार्ड, जिल्हा बँक व विकास संस्था या साखळीतून शेतकऱ्यांना पीककर्ज मिळते. राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकाच्या माध्यमातूनही कर्जपुरवठा केला जातो. केंद्र व राज्य शासन एक लाखापर्यंतचे पीक कर्जावरील व्याज देते, तीन लाखांपर्यंतही शासन सवलतीच्या व्याज दराने कर्ज वाटप करते. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करायचा झाल्यास येथे विकास संस्था व जिल्हा बँक सक्षम असल्याने बहुतांशी कर्जपुरवठा हा जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच होतो. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत खरीप पीककर्ज तर ऑक्टोबरपासून रब्बी पीक कर्जाचे वाटप केले जाते.
सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून, त्यासाठी विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पीककर्ज उचलण्यास सुरुवात केली आहे. यंदा जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीने जिल्हा बँकेला ८७५ कोटी तर, राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांना ४३५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.
जिल्हा बँकेने आतापर्यंत ४१४ कोटी ५६ लाख रुपयांचे वाटप केले आहे. इतर बँकांनी ८७ कोटी रुपये शेतकऱ्यांना पीककर्ज म्हणून दिले आहे. विकास संस्थांच्या पातळीवर कर्ज नवे जुने करण्याचे प्रमाण खूप असते. साधारणत: जून महिन्यात ही प्रक्रिया अधिक वेग घेते. त्यामुळे या महिन्याभरात ४०० कोटींचे कर्ज वाटप विकास संस्थांच्या पातळीवर होऊ शकते.
जिल्हा बँकेकडे ओढा वाढला
जिल्हा बँकेने पाच लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज वाटप करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे पूर्वी इतर बँकांकडे असणारे शेतकरी आता जिल्हा बँकेकडे येऊ लागले आहेत.
दृष्टिक्षेपात खरीप हंगाम व पीककर्ज वाटप-
खरीप क्षेत्र -१ लाख ६३ हजार हेक्टर
खरीप पीककर्ज उद्दिष्ट -१३१० कोटी
वाटप महिने - एप्रिल ते सप्टेंबर
जिल्हा बँक वाटप, कंसात उदिष्ट- ४१४.५६ कोटी (८७५ कोटी)
इतर बँका वाटप, कंसात उदिष्ट- ८७ कोटी (४३५ कोटी)