जिल्हा बँक प्रारूप यादी कार्यक्रमाची आज घोषणा शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:29 AM2021-08-13T04:29:01+5:302021-08-13T04:29:01+5:30
कोल्हापूर: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या कालबध्द ...
कोल्हापूर: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या कालबध्द कार्यक्रमाची घोषणा आज शुक्रवारी होणार आहे. सहकार प्राधिकरणामार्फत होणाऱ्या या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून गुरुवारी राज्यातील विभागीय सहनिबंधकांची व्हीसीद्वारे बैठक झाली. यात मतदार यादीत एकसूत्रीपणा आणण्यावर भर देण्यात आला.
महापूर, कोरोना यामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक घेण्यासंदर्भात सहकार प्राधिकरणने हिरवा कंदील दर्शवल्यानंतर हालचाली वेगावल्या आहेत. एका बाजूला राजकीय आडाखे बांधण्यात नेते, कार्यकर्ते व्यस्त असताना सहकार विभागातही हालचाली वेगावल्या आहेत. याच अनुषंगाने गुरुवारी निवडणुका होऊ घातलेल्या १२ जिल्हा बँकांतर्गंत येणाऱ्या सहकार अधिकाऱ्यांची बैठक झाली. कोल्हापुरातून विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी सहभाग घेतला.
यात मतदार यादी कार्यक्रम कशाप्रकारे राबवायचा याबाबत चर्चा झाली. मतदार यादी प्रसिध्द करणे, त्यावरील हरकती, सुनावणी, अंतिम मतदार तयार करणे आदिंच्या बाबतीत कालबध्द कार्यक्रम कधीपासून सुरुवात करायचा, याच्या बाबतीतही चर्चा झाली.
दरम्यान कोल्हापूर जिल्हा बँकेची प्रारूप व अंतिम मतदार यादी याआधीच प्रसिध्द झाली आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली होती, पण कोरोनामुळे ही निवडणूक प्रक्रिया स्थगितीचा निर्णय शासनाने घेतला. यालाही सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. निवडणूक स्थगितीपासून ते आतापर्यंत कोरोनामुळे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
चौकट
या बँकांची निवडणूक
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, जळगाव, लातूर, नाशिक, धुळे नंदुरबार या १२ जिल्हा बँकांची निवडणूक होत आहे.
चौकट
अंतिम की प्रारूप
संचालक मंडळाची मुदत संपून दीड वर्ष झालेल्या आणि ३१ ऑगस्टपर्यंतच निवडणूक स्थगितीची मुदत असलेल्या जिल्हा बँकांच्या निवडणुका या ज्या टप्प्यावर थांबल्या होत्या, त्याच टप्प्यावरून पुढे सुरू होतील, असे सांगत अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे सहकार विभागाने आदेशात म्हटले असलेतरी आता प्रारूप याद्या करण्याबाबतचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे मतदार यादी अंतिम की प्रारूप प्रसिध्द होणार याबाबत संभ्रमावस्था आहे.