जिल्हा बँक निवडणूक : सतेज पाटील यांची धक्कादायकरीत्या माघार
By admin | Published: April 25, 2015 12:49 AM2015-04-25T00:49:44+5:302015-04-25T00:50:06+5:30
महाडिक, कोरे, पी. एन., ए. वाय. बिनविरोध
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी (केडीसीसी) जागेइतकेच उमेदवार राहिल्यामुळे काँग्रेसचे नेते व माजी आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील, काँग्रेसचे नेते महादेवराव महाडिक, जनसुराज्य पक्षाचे नेते व माजी आमदार विनय कोरे यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
उर्वरित १७ जागांसाठी मतदान होणार आहे. माघारीच्या वेळेत न आल्यामुळे माजी खासदार निवेदिता माने, उदयानी साळुंखे यांना बिनविरोध होण्याची संधी हुकली. गुरुवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी हे चित्र स्पष्ट झाले. खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आदींनी माघार घेतली.
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीसाठी सर्व गटांतून तब्बल ३५२ उमेदवार पात्र ठरले होते. शुक्रवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत होती. ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे निकाल असल्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे पॅनेल निश्चित होऊन उमेदवार निश्चित होण्यास विलंब झाला. यामुळे दुपारी दोन नंतर जिल्हा बँकेच्या इमारतीमध्ये माघारीसाठी गर्दी झाली. पॅनेलमध्ये संधी न मिळालेल्या आणि अपक्ष अशा २७६ उमेदवारांनी माघार घेतली.
प्राथमिक कृषी पतपुरवठा, विकास सेवा संस्था गटातून करवीर तालुक्यातील राहुल पाटील, संभाजी पाटील, अशोकराव पवार-पाटील, अनिल पाटील, सरदार पाटील, दादासाहेब लाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, महादेव पाटील, रघुनाथ जाधव यांनी माघार घेतली. पी. एन. पाटील यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ते बिनविरोध झाले. पन्हाळा तालुक्यातून बाळासाहेब सरनाईक, विजयसिंह जाधव, केरबा चौगुले, जयवंत हिर्डेकर, आनंदा बेलेकर, दौलतराव पाटील, शामराव पाटील, प्रकाश पाटील यांनी माघार घेतली. विनय कोरे यांचा एकमेव अर्ज राहिला.
राधानगरी तालुक्यातून अर्चना पाटील, राजेंद्र पाटील, आशिष पाटील, विश्वनाथ पाटील, उदयसिंह पाटील-कौलवकर, जयसिंग खामकर, शामराव भावकी यांनी माघार घेतली; तर ए. वाय. पाटील यांचा एकमेव अर्ज राहिला. हातकणंगले तालुक्यातून आमदार अमल महाडिक, संजय मगदूम यांनी माघार घेतली. आमदार महादेवराव महाडिक यांचा एकमेव अर्ज राहिला. उर्वरित गटात लढत होणार आहे.
रिंगणातील उमेदवार असे : विकास सेवा संस्था गट - अशोक चराटी, जयवंतराव शिंपी (आजरा), नंदकुमार ढेंगे, कृष्णराव पाटील (भुदरगड), गोपाळराव पाटील, नरसिंगराव पाटील (चंदगड), सोमगोंडा आरबोळे, संतोष पाटील ( गडहिंग्लज), मानसिंग पाटील, पांडुरंग शिंदे (गगनबावडा), आमदार हसन मुश्रीफ, दत्तात्रय वालावलकर (कागल), आनंदराव पाटील, पृथ्वीराज खानविलकर, सर्जेराव पाटील (शाहूवाडी), विठ्ठलराव नाईक -निंबाळकर, राजेंद्र पाटील- यड्रावकर (शिरोळ).
कृषी पणन शेतीमाल प्रक्रिया संस्था : नामदेवराव नार्वेकर, संजय मंडलिक, दिलीप पाटील, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर.
नागरी सहकारी बँका व नागरी पतसंस्था - अनिल पाटील, जयंत पाटील, व्ही. बी. पाटील, गजाननराव देसाई, यशवंत सोनार.
इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद - प्रताप माने, विलास पाटील, रघुनाथ पाटील, सातगोंडा पाटील, सीताराम रवंदे, केरबा चौगुले.
इतर मागासवर्गीय - अविनाश पाटील, शाहू चव्हाण, सुधीर मुंज, विलासराव गाताडे.
अनुसूचित जाती-जमाती - राजू आवळे, शिवाजी कांबळे, व्यंकट कांबळे, हेमंत कोतमिरे, पांडुरंग मोरे, आमदार सुजित मिणचेकर, संजय वाघ, निवृत्ती सातपुते, भैरू हंगारे.
विमुक्त जाती / भटक्या जमाती - उदय नाळे, भूपाल बाळाई, परशराम तावरे, अप्पी पाटील.
महिला राखीव - माजी खासदार निवेदिता माने, जयश्री रेडेकर, सुजाता सातवणेकर, उदयानी साळुंखे.
कंसात जागा आणि रिंगणातील उमदेवार असे :
सेवा संस्था गट (१२) २१, कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया संस्था (२) ४, नागरी सहकारी बँका, नागरी पतसंस्था (१) ५, इतर शेती संस्था, व्यक्ती सभासद (१) ६, इतर मागासवर्गीय (१) ४, अनुसूचित जाती व जमाती (१) ९, विमुक्त जाती, जमाती (१)४, महिला (२)४.
माघारीसाठी शर्थीचे प्रयत्न असफल..
महिला गटातून रिंगणात असलेल्या माजी खासदार निवेदिता माने व उदयानी साळुंखे यांनी विरोधी उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी दुपारी दोननंतर प्रयत्न करण्यास सुरुवात केली. दीपाताई पाटील यांचा उमदेवारी अर्ज माघारी करण्यात त्यांना यश आले. उर्वरित जयश्री रेडेकर, सुजाता सातवणेकर या माघारीचा अर्ज तीनच्या आत देऊ शकल्या नाहीत. रेडेकर या गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर तर्फ नेसरी, तर रेडेकर या चंदगडच्या आहेत. दोघींचाही माघारीचा अर्ज घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांच्याकडे त्यांनी दिला. मात्र तीनच्या आत अर्ज आला नसल्याने माघाराची अर्ज त्यांनी घेतला नाही. माजी खासदार माने यांनीही भेटून विनंती केली. मात्र, कदम आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे रेडेकर, सातवणेकर रिंगणात राहिल्या. माघारीचा प्रयत्न असफल झाला.