जिल्हा बँकेकडून ‘सेवा कराची’ वसुली सुरूच
By admin | Published: May 17, 2016 10:18 PM2016-05-17T22:18:59+5:302016-05-18T00:19:48+5:30
खातेदार संतप्त : एप्रिल महिन्याच्या एन्ट्रीत ११.४५ पैसे वसूल
प्रकाश पाटील -- कोपार्डे--शेतकऱ्यांची बँक म्हणून गणना होणाऱ्या जिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून सेवा कर वसूल करण्यास सुरुवात केली आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर प्रशासनाकडून सेवा कर वसूल केला जाणार नाही, असे जाहीर केले. तरीही एप्रिलच्या एन्ट्रीमध्ये पुन्हा ११.४५ पैसे सेवा कराची वसुली दिसत आहे. जिल्हा बँकेतून प्रामुख्याने पीक कर्ज व विविध शासकीय योजनांचे अनुदान वाटप केले जाते. त्यामुळे शेतकरी व ग्रामीण जनतेला अर्थपुरवठा करणारा एक महत्त्वाचा आर्थिक स्रोत गणला जातो. या बँकेत जिल्ह्यातील सर्व सेवा संस्थांची खाती असून, पीक कर्जाचे वाटप सेवा संस्था शेतकरी, सभासदांना येथूनच करतात, त्यामुळे पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकरी १०० टक्के जिल्हा बँकेशी जोडला गेला आहे. एवढेच नाही तर दूध संस्था, नागरी पतसंस्था व काही नागरी सहकारी बँकांचे व्यवहारही जिल्हा बँकेतूनच होतात, अशा सर्व खातेदारांची एकूण संख्या आठ लाख आहे. एप्रिल महिन्यात जिल्हा बँकेने सेवाकर वसुलीचा धडाका लावून जानेवारी, फेबु्रवारी व मार्च या तीन महिन्यांचेही सेवाकर म्हणून ११ रुपये ४५ पैसे प्रति महिना वसूल केले. पासबुकवर सलग तीन एन्ट्री पाहून खातेदार संतप्त झाले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या प्रशासनाने नरमाईचे धोरण घेत नाबार्ड व अर्थ मंत्रालयाच्या निर्देशनानुसार ही वसुली केल्याचे जाहीर केले. यानंतर बँकेच्या अध्यक्षांसह प्रशासनाने यापुढे सेवाकर वसूल केला जाणार नाही, असे जाहीर केले. मात्र, एप्रिल महिना संपताच त्या महिन्याच्या सेवा कर वसुलीची एन्ट्री दिसली. त्यामुळे खातेदार, शेतकरी, सेवा संस्था, दूध संस्था, विविध योजनांचे लाभार्थी पुन्हा संतप्त झाले. इतर नागरी सहकारी बँका सेवा कर अत्यंत जुजबी आकारत आहेत. मग जिल्हा बँकेनेच ही वसुली का सुरू केली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
खातेदारांच्या खिशाला कात्री
सेवा कराबाबत जिल्ह्यातील प्रतिथयश नागरी बँकांकडे चौकशी केली असता सहा महिन्यांतून एकदा १८ ते २० रुपये सेवा कर घेत असल्याचे बँकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. म्हणजे वर्षाला ३६ ते ४० रुपये हा सेवा कर आकारला जातो. मात्र, ११.४५ प्रति महिना घेतल्यास वर्षाला १३७ रुपये ४० पैसे जिल्हा बँकेच्या खातेदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
शेजारच्या सांगली जिल्हा बँकेने शेतकरी हित समोर ठेवून सेवाकर न आकारण्याचे जाहीर केले. मग कोल्हापूर जिल्हा बँकेवरच असा कोणता दबाव आहे? गेली दहा वर्षे जिल्हा बँकेकडून सेवा संस्थांचे १५० कोटी भागभांडवल पडून आहे. यावर जिल्हा बँक व्यवसाय करते. मात्र, सेवा संस्थांना गेली दहा वर्षे एक रुपयाही लाभांश दिलेला नाही. महिन्याला सेवा करातून कोटीत पैसा उकळला जात आहे.
- विठ्ठल पाटील, सचिव हनुमान सेवा संस्था,
पाटपन्हाळा, ता. पन्हाळा