जुन्या नोटांमुळे जिल्हा बॅँकेला तोटा
By admin | Published: March 26, 2017 11:56 PM2017-03-26T23:56:31+5:302017-03-26T23:56:31+5:30
ंआर्थिक संकट : तब्बल २७० कोटींच्या नोटा धूळखात
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
नोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅँकेच्या विविध शाखांत जमा झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा गेले पाच महिने तशाच पडून राहिल्याने त्याचा फटका बॅँकेला बसणार आहे. बॅँकेला पंधरा कोटींहून अधिक व्याजाचा भुर्दंड बसला असून, या दणक्यामुळे बॅँकेच्या ताळेबंदावर ताण आला आहे. मागील सर्वसाधारण सभेत संस्था सभासदांना कोणत्याही परिस्थितीत लाभांश दिला जाईल, असा शब्द दिलेल्या संचालक मंडळाची ताळेबंद करताना मात्र दमछाक उडाली आहे.
केंद्र सरकारने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चलनातील ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याने तीन महिने सामान्य माणसाला त्याचा त्रास झाला. सुरुवातीच्या तीन दिवसांत जुन्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बॅँकेला परवानगी दिली; पण त्यानंतर ती नाकारण्यात आली. राज्याचा विचार केला तर जिल्हा बॅँकांकडे पाच हजार कोटींच्या नोटा जमा झाल्या; तर जिल्हा बॅँकेत तीन दिवसांत १९१ शाखांत २७० कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. या नोटा करन्सी चेस्ट बॅँकांनी जमा करून घेण्यास नकार दिल्याने जिल्हा बॅँकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले; पण अद्याप जिल्हा बॅँकेच्या कॅशरूममध्ये २७० कोटी अक्षरश: धूळखात पडून आहेत. ज्या खातेदारांनी ही रक्कम भरली, बॅँकांना मात्र त्यांना व्याज द्यावे लागत आहे. ‘नाबार्ड’च्या तपासणीनंतर ही रक्कम दोन-तीन दिवसांत करन्सी चेस्टच्या माध्यमातून जमा करून घेतील, असा अंंदाज होता; पण तपासणी होऊन दीड महिन्याचा कालावधी गेला तरी याबाबत निर्णय झालेला नाही.
बॅँकेचा ताळेबंद तयार करण्याचे काम सुरू असून, नोटाबंदीच्या काळात कमी झालेल्या व्यवहारांचा ताण त्यावर दिसत आहे. २७० कोटींमुळे रोज बॅँकेला १० लाखांचा तोटा झालाच; पण त्याबरोबर कर्जवाटपासह इतर व्यवहारांवर गंभीर परिणाम झाले. त्यामुळेही बॅँकेला मोठा फटका बसला. ऐन वसुलीच्या काळात नोटाबंदीचा झटका बसल्याने बॅँकेला सुमारे १५ कोटींचा फटका बसणार आहे. संचालकांच्या शंभर कोटी नफा कमवून संचित तोटा कमी करण्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात खीळ बसली असून, मागील सर्वसाधारण सभेमध्ये संस्था सभासदांना लाभांश देण्याची घोषणा अध्यक्षांनी केली होती. तिची पूर्तता करताना संचालकांची दमछाक होणार हे नक्की आहे.
उद्दिष्ट गाठणे अवघड
मागील आर्थिक वर्षांनंतर संचालकांनी पाच हजार कोटींच्या ठेवी व शंभर कोटींच्या नफ्याचे उद्दिष्ट ठेवले होते; पण नोटाबंदीनंतर ग्राहकांना अपेक्षित पैसे मिळेनात. त्याचा परिणाम ठेवींवर झाला असून, आतापर्यंत कसातरी ठेवींचा आकडा ३८०० कोटींपर्यंत गेला आहे. त्यामुळे एकूणच नफ्यावर परिणाम झाला असून साधारणत: ६० कोटींपर्यंतच नफा राहील, असा अंदाज आहे.
बॅँकांत ‘मार्च अखेर’ची गडबड
‘मार्च अखेर’ जवळ आल्याने सहकारीसह राष्ट्रीयीकृत बॅँकांची एकच धांदल उडाली आहे. रविवारी सुटीदिवशीही बॅँकांचे कामकाज सुरू राहिले; पण ग्राहकांचा तसा प्रतिसाद दिसला नाही. मार्च महिना बॅँकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. वर्षभर वाटप केलेल्या कर्जांसाठी वसुली मोहीम राबवावी लागते.
वसुलीपथक एका बाजूला काम करीत असताना बॅँकेचे इतर कर्मचारी अंतर्गत कामांत व्यस्त राहतात. आगामी पाच दिवसांत बॅँकांची धांदल वाढणार आहे. ठेव व कर्ज खात्यांवर व्याज चढविणे, थकीत कर्जे व त्यावरील व्याजाची ताळेबंदाला तरतूद करणे, गुंतवणूक व त्यातून मिळणारे उत्पन्न घेऊन नफा-तोटा पत्रक तयार करण्याचे काम बॅँकेत सध्या सुरू आहे.
महिनाअखेर ग्राहकांना करभरणा करणे तसेच अन्य सरकारी देणी देणे सुलभ व्हावे, यासाठी रिझर्व्ह बॅँकेने २५ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत बॅँका सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि. २८) साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने ग्राहकांना गुंतवणूक करता यावी, यासाठी जिल्हा बॅँकेच्या शाखांचे कामकाज सुरू राहणार आहे.