जिल्हा बँकेची विक्रमी नफ्याकडे वाटचाल, सहा महिन्यांत १५० कोटींचा ढोबळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 03:19 PM2020-10-07T15:19:15+5:302020-10-07T15:23:01+5:30
kolhapurnews, zilhabank, bankingsector, कोल्हापूर जिल्हा बँकेची वाटचाल विक्रमी नफ्याकडे सुरू असून, पहिल्या सहा महिन्यांत तब्बल १५० कोटींपर्यंत ढोबळ नफा पोहोचला आहे. ऐन कोरोनाच्या काळातही बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम केल्याने मार्चपर्यंत बँकेच्या इतिहासातील विक्रमी नफ्याची नोंद होण्याची शक्यता आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्हा बँकेची वाटचाल विक्रमी नफ्याकडे सुरू असून, पहिल्या सहा महिन्यांत तब्बल १५० कोटींपर्यंत ढोबळ नफा पोहोचला आहे. ऐन कोरोनाच्या काळातही बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम केल्याने मार्चपर्यंत बँकेच्या इतिहासातील विक्रमी नफ्याची नोंद होण्याची शक्यता आहे.
शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांची बँक म्हणून जिल्हा बँकांकडे पाहिले जाते. बँक वर्षाला सरासरी १३०० कोटी पीक कर्जाचे वाटप करते. नाबार्ड यातील निम्मे कर्ज सवलतीच्या दराने देत असल्याने बँकेला मोठा आर्थिक फटका बसतो. तरीही बँकेने गेल्या पाच वर्षांत नेत्रदीपक प्रगती केली आहे.
प्रशासकीय कारकिर्द गेल्यानंतर बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाने बँकेच्या कामकाजाला कमालीची शिस्त लावली. नोटाबंदीमुळे बँकेची आर्थिक घडी विस्कटते की काय, असे असताना मोठ्या खुबीने संचालक मंडळाने त्या परिस्थितीवर मात करीत बँकेला नफ्यात आणले. गेल्या हंगामात (२०१९-२०) मध्ये बँकेचा नफा राज्यात आघाडीवर राहिला.
या (२०२०-२१) या आर्थिक वर्षाची सुरुवातच कोरोनाच्या संकटाने झाली. तीन महिने लॉकडाऊनमुळे बँकिंग क्षेत्रावर परिणाम झाला. संकटातही संधी शोधण्याचा प्रयत्न बँकेच्या व्यवस्थापनाने केल्याने सप्टेंबरअखेर तब्बल सहा हजार कोटी ठेवींचा, तर ४५०० कोटी कर्जाचा टप्पा पार केला.
पहिल्या सहा महिन्यांत बँकेचा ढोबळ नफा १५० कोटी आहे. मार्च २०२१ पर्यंत २०० कोटींच्या वर ढोबळ नफा जाऊन निव्वळ नफा १०० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. बँकेच्या इतिहासातील हा विक्रमी नफा असेल.
वसुलीमुळेच नफा शक्य
सहा महिन्यांत कर्जे वाढली तरी कर्मचाऱ्यांनी ताकदीने वसुली यंत्रणा राबविली. विशेष म्हणजे साखर कारखान्यांचे दर महिन्याला व्याज मिळत गेल्यानेच नफा वाढल्याचे जाणकारांचे मत आहे.
दृष्टिक्षेपात बँक
आर्थिक वर्ष ठेव कर्ज ढोबळ नफा निव्वळ नफा
- मार्च २०२० ५७४१.३९ कोटी ४१०९.७८ कोटी १३०.७७ कोटी ३७.७३ कोटी
- सप्टेंबर २०२० ६०९८ कोटी ४५०० कोटी १५० कोटी -