जिल्हा बॅँकेच्या ‘अनुकंपा’ना न्याय मिळणार; अकरा वर्षे भरतीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:43 AM2019-11-19T10:43:22+5:302019-11-19T10:46:15+5:30
कोणत्याही परिस्थितीत या कर्मचा-यांना कामावर घेतले जाईल, असे संचालकांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली असून, २८ नोव्हेंबर रोजी होणाºया संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून साधारणता १ डिसेंबरपासून या कर्मचाºयांना कामावर घेण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत गेली अकरा वर्षे अनुकंपाखालील भरतीच केलेली नाही. त्यामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची फार परवड होत असून, त्यांनी साखळी उपोषण केले होते. अखेर संचालक मंडळाने अनुकंपाखालील लोकांना कामावर घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.
जिल्हा बॅँकेत २००८ पासून अनुकंपाखालील भरतीच झालेली नाही. बॅँकेवर २००९ ला प्रशासक मंडळ आल्यानंतर हा विषय थांबला होता. त्यानंतर २०१५ ला संचालक मंडळ कार्यरत झाल्यानंतर त्यांनी बॅँक सुस्थितीत आणली. मध्यंतरी रोजंदारीवरील शंभर कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी अनुकंपा कर्मचा-यांनाही कामावर घेण्याची मागणी युनियनने केली होती. त्यासाठी बॅँकेच्या दारात साखळी उपोषणही केले होते. कोणत्याही परिस्थितीत या कर्मचा-यांना कामावर घेतले जाईल, असे संचालकांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली असून, २८ नोव्हेंबर रोजी होणा-या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून साधारणता १ डिसेंबरपासून या कर्मचा-यांना कामावर घेण्याची शक्यता आहे. अनुकंपाचे ७० कर्मचारी असून, गेली अकरा वर्षे ते प्रतीक्षेत आहेत.