जिल्हा बँकेला १२३ कोटींचा ढोबळ नफा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:06+5:302021-04-01T04:26:06+5:30
(जिल्हा बँक लोगो) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात १२३ कोटींचा ...
(जिल्हा बँक लोगो)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात १२३ कोटींचा ढोबळ नफा झाला असून सात हजार कोटी ठेवीचा टप्पाही पार केल्याचे समजते. गेल्या आर्थिक वर्षात १३० कोटी ७७ लाखाचा ढोबळ नफा झाला होता.
जिल्हा बँकेवरील प्रशासक जाऊन २०१५ ला संचालक मंडळ कार्यरत झाले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी बँकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर काटेकोर नियोजनानुसार गेली पावणेसहा वर्षेे कामकाज सुरू आहे. त्यामुळेच बँक संचित तोट्यातून बाहेर येऊन नफ्यात आली. बँकेला २०१४-१५ मध्ये १०३ कोटी, तर २०१५-१६ मध्ये ७४ कोटींचा तोटा होता. त्यातून बाहेर पडत २०१६-१७ ला बँकेने ८७ कोटींचा निव्वळ नफा कमावला. गेल्या आर्थिक वर्षात १३० कोटी ७७ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला होता. तरतुदी वजा जाता ३७ कोटी ७३ लाख निव्वळ नफा झाला होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोनामुळे बँकिंग क्षेत्रापुढे अनेक अडचणी आल्या. त्याचा परिणामही यंदा बँकांच्या ताळेबंदावर दिसणार आहे. त्याचा फटकाही जिल्हा बँकेला बसल्याचे दिसते. त्यामुळे १२३ कोटी निव्वळ नफा झाला असून पगारदार खात्यांना विमा संरक्षण, कोरोना मदतीसह इतर तरतुदी करून सुमारे ६५ कोटींचा निव्वळ नफा होईल, असे समजते.
रात्री उशिरापर्यंत जमा-खर्च
जिल्हा बँकेकडे या आर्थिक वर्षात ठेवींचा ओघ वाढला आहे. बुधवारी आर्थिक वर्षाअखेर असल्याने ठेवी संकलनाचे काम युध्दपातळीवर सुरू होते. एकूणच शाखानिहाय जमा-खर्च रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला.