अवसायनातील संस्थांमुळे जिल्हा बँकेची यादी फुगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:30 AM2021-02-17T04:30:31+5:302021-02-17T04:30:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार विभागाकडे पाठवलेल्या संस्था सभासदांच्या यादीत अवसायनातील संस्थांचाही समावेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार विभागाकडे पाठवलेल्या संस्था सभासदांच्या यादीत अवसायनातील संस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे बँकेच्या यादी आणि संभाव्य दाखल होणारे ठराव यामध्ये तफावत दिसत आहे. सहकार विभागाने अवसायनातील संस्थांना चाळण लावली आहे. बँकेच्या यादीनुसार ११,४७५ ठराव येणे अपेक्षित आहेत; मात्र आतापर्यंत ७,१९९ ठराव दाखल झाले आहेत.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत मे २०२० मध्ये संपलेली आहे. त्यामुळे विभागीय सहनिबंधक कार्यालयाने डिसेंबर २०१९ पासून मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला. जिल्हा बँकेने चार गटांतील ११,४७५ संस्थांची यादी पाठवली. त्यानुसार ठराव मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली, मात्र कर्जमाफी व नंतर कोराेनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या.
वास्तविक जिल्हा बँकेने आपल्या संलग्न संस्थांची यादी तयार करताना अवसायनातील संस्था वगळून करणे अपेक्षित होते. मात्र, अवसायनातील संस्थांसह यादी सहकार विभागाकडे दिली. ठराव दाखल करण्याची मुदत संपण्यास चार दिवस राहिले असताना प्रक्रिया थांबविली. त्यावेळी ७,१७५ ठराव दाखल झाले होते. आता जिथे थांबली तेथून प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारपर्यंत ठराव दाखल करता येणार आहेत. मात्र, अद्याप बँकेच्या यादीप्रमाणे चार हजार ठराव यायचे आहेत.
गेल्या सहा वर्षांत हजारो संस्था अवसायनात काढल्या आहेत. त्यांना यादीतून वगळणे गरजेचे होते. आता सहकार विभागाने चाळण लावली आहे.
८० संस्थांचे पुनरुज्जीवन
गेल्या सहा वर्षांत अनेक संस्थांच्या नोंदणी रद्द झाल्या आहेत. त्यापैकी ८० संस्थांचे पुनरुज्जीवन झाले आहे. त्यांचा समावेशही नवीन यादीत करावा लागणार आहे.
गटनिहाय आतापर्यंत दाखल झालेले ठराव असे, कंसात मंगळवारचे -
गट क्रमांक संस्था दाखल ठराव
१ विकास १८४४
२ खरेदी विक्री ४८०
३ नागरी पत ११८६
४ पाणी, दूध व इतर ३६८९