जिल्हा बँकेच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅँक स्वीकारणार
By admin | Published: February 19, 2017 12:47 AM2017-02-19T00:47:36+5:302017-02-19T00:47:36+5:30
२७० कोटींच्या नोटा : नाबार्ड पडताळणीत संपूर्ण ‘केवायसी’ पूर्तता
कोल्हापूर : नोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅँकेत जमा झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या तब्बल २७० कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेकडून स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाबार्डने ५० हजारांपेक्षा अधिक जमा झालेल्या खात्यांची ‘केवायसी’ पडताळणी केली. यामध्ये सगळ्या खात्यांची पूर्तता झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत बॅँकेत पडून असलेले पैसे बदलून देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यानंतर पहिल्या दोन-तीन दिवसांत जिल्हा बॅँकेच्या १९१ शाखांत तब्बल २७० कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. रिझर्व्ह बॅँकेच्या सूचनेनुसार दोन लाखांपेक्षा जास्त जमा झालेल्या खात्यांची यापूर्वीच तपासणी नाबार्डने केली होती; पण स्वीकारलेले पैसे बदलून देण्यास रिझर्व्ह बॅँकेने काहीशी असमर्थता दर्शविल्याने जिल्हा बँकांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने ५० हजारांपेक्षा अधिक जमा झालेल्या खात्यांची ‘केवायसी’ तपासणी करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार रिझर्व्ह बॅँकेने नाबार्डच्या माध्यमातून सोमवारपासून ‘केवायसी’ची पडताळणी केली. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक यांच्यासह सहा सदस्यांनी शुक्रवारी पडताळणीचे काम पूर्ण करून शनिवारी एकत्रित अहवाल तयार केला. येत्या दोन-तीन दिवसांत २७० कोटींच्या जुन्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया रिझर्व्ह बॅँकेकडून सुरू होईल.
नाबार्डने कशी केली पडताळणी
५० हजार रुपयांपेक्षा अधिक जमा असलेली खाती
प्रत्येक शाखेतील ७५ खात्यांची केली पडताळणी
३ हजार व्यक्तिगत, तर एक हजार संस्था खात्यांचा समावेश
रोज साडेतीन लाखांचे नुकसान
जिल्हा बॅँकेत २७० कोटी रुपये ८ नोव्हेंबरपासून पडून आहेत. सेव्हिंगचे व्याज गृहीत धरले तर रोज साडेतीन लाखांचा फटका बॅँकेला बसला आहे. त्यामुळे या रकमेबाबत लवकर निर्णय होणे बॅँकेच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
आॅनलाईन अहवाल
नाबार्डच्या पडताळणीचा अहवाल शनिवारी दुपारीच पुणे कार्यालयाला आॅनलाईन पाठविला जाणार होता; पण पोर्टल बंद पडल्याने रात्री उशिरा किंवा रविवारी सकाळी तो पाठविला जाणार आहे. पुणे कार्यालयाकडून मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे अहवाल सादर केला जाणार असून, तेथून रिझर्व्ह बँकेकडे पाठविला जाणार आहे.
नाबार्डने ‘केवायसी’ पडताळणी केली. शंभर टक्के पूर्तता असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लवकरच जुन्या नोटा बदलून मिळतील.
- प्रतापसिंह चव्हाण,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक