जिल्हाधिकाऱ्यांनी केली अंबाबाई मूर्तीची पाहणी
By admin | Published: May 29, 2017 04:22 PM2017-05-29T16:22:49+5:302017-05-29T16:22:49+5:30
पुरातत्व अधिकाऱ्यांशी चर्चा, अहवालानंतर पुढील उपाययोजना
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २९: रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर दोनच वर्षात पांढरे डाग पडून लेप निघालेल्या अंबाबाई मूर्तीची सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यांनी पूरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून या आठवड्यात तज्ञांकडून मूर्तीची पाहणी करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतर मूर्ती संवर्धनासंबंधी निर्णय घेतला जाईल.
शुक्रवारच्या पहाटेच्या पूजेचेच्या छायाचित्रात अंबाबाई मूर्तीचे पाय, गदा आणि सिंह यावर पांढरे डाग पडल्याचे आणि मूर्तीवरील लेप निघाल्याचे दिसून आले. या घटनेची जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांनी गंभीर दखल घेतले. सोमवारी सकाळी साडे आठच्या अभिषेकाला ते स्वत: उपस्थित राहीले. देवीचे सर्व पूजा विधी त्यांनी पाहिल्या व मूर्तीचे निरीक्षण केले. बाहेर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबादमधील पूरातत्वचे अधिकारी मिश्रा यांच्याशी संपर्क साधून मूर्तीवर पडत असलेले डाग आणि लेप यांची माहिती दिली व पूरातत्वच्या तज्ञ व्यक्तींनी मूर्तीची पाहणी करावी अशी विनंती केली. त्यावर मिश्रा यांनी देवस्थान समितीच्यावतीने सदर आशयाचे पत्र पूरातत्व खात्याला पाठवा आम्ही या आठवड्यातच पूरातत्वच्या अधिकाऱ्यांना मूर्तीची पाहणी करण्यासाठी पाठवू असे आश्वासन दिले. त्यानुसार देवस्थान समितीच्यावतीने दोन दिवसात हे पत्र पाठवण्यात येणार आहे.
मूर्तीची संवर्धन प्रक्रिया तत्कालिन अधिकारी मनेजर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. आता ते निवृत्त झाले आहेत मात्र त्यांनी मूर्तीचे कशाप्रकारे संवर्धन केले होते. याचिही माहिती पूरातत्व खात्याचे अधिकारी घेणार आहेत. या आठवड्यात हे अधिकारी येवून मूर्तीची पाहणी करतील. त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर मूर्ती संवर्धनासंबंधीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सोमवारी सकाळी मी स्वत: मूर्तीची पाहणी केली. गाभाऱ्यातील आर्द्रता कमी करण्यासाठी बऱ्यापैकी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र मूर्तीवरील पांढरे डाग आणि लेप याबाबत पूरातत्व खात्याचे अधिकारीच सांगू शकतील. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला असून या आठवड्यात ते मूर्तीची पाहणी करून अहवाल देतील. त्यानंतप पुढील निर्णय घेण्यात येईल.
अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी
आर्द्रता समितीची होणार बैठक
अंबाबाई मूर्तीसंवर्धनासाठी आर्द्रता समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीनेही नैसर्गिक झरोखे खुले करणे, फरशा काढणे अशा विविध शिफारशी केल्या होत्या. आता मूर्तीच्या अवस्थेनंतर आर्द्रता समितीचे सदस्यही मूर्तीची पाहणी करणार आहेत. त्यांचीही लवकरच बैठक बोलावण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.