जिल्हा बॅँक निवडणुकीत ‘कोटींची’ उड्डाणे ?
By admin | Published: April 27, 2015 11:33 PM2015-04-27T23:33:50+5:302015-04-28T00:32:20+5:30
घोडेबाजाराला वेग; अफवांना उधाण
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक संचालक मंडळाच्या ५ मे २०१५ रोजी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी सहकार पॅनेल व शिवसेनेच्या शिवसंकल्प पॅनेलमध्ये जोरदार चुरस आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात घोडेबाजारालाही ऊत आला असून, मतांसाठी कोटींची उड्डाणे सुरू असल्याच्या चर्चेने खळबळ माजली आहे. दोन्ही पॅनेल्सनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चर्चा, अफवांनाही उधाण आले आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा बॅँक राष्ट्रवादी, कॉँग्रेसच्या वर्चस्वाखाली आहे. आठ वर्षांपूर्वी ही बॅँक डबघाईला आली होती. त्यावेळी जी निवडणूक झाली त्यात राजकीय नाट्य घडून डॉ. तानाजी चोरगे हे बॅँकेचे चेअरमन झाले. मात्र त्यानंतरच्या आठ वर्षांच्या काळात तोट्यातील बॅँकेला पुन्हा रूळावर आणण्यात व फायद्यात आणण्यात डॉ. चोरगे व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आल्याचा व ही बॅँक पुन्हा सुरळीत चालविण्यासाठी सहकार पॅनेलचीच आवश्यकता असल्याचे मुद्दे सहकारतर्फे प्रचारात हिरीरिने मांडले जात आहेत. त्याचवेळी बँकेतील भरतीमध्ये झालेला गैरव्यवहार आणि त्याबाबत रमेश कदम यांनी केलेले आरोप याचे भांडवल करून शिवसेना मैदानात उतरली आहे.
ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी अटकळ होती. परंतु जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखताना सहकार क्षेत्रावरही आपल्या वर्चस्वाचा ठसा उमटविण्याचा चंग बांधला आहे.
कोटीची आॅफर?
जिल्हा बॅँक निवडणुकीत अटीतटीचा सामना असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदार फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. मतदार आपल्यालाच मतदान करणार की नाही, यासाठी उलट तपासणीही सुरू झाली आहे. काही मतदार आपल्याला दुसऱ्या गटाकडून कोटीची आॅफर असल्याच्या अफवा पिकवून राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे घोडेबाजार तेजीत असल्याची चर्चा आहे.
घडी विस्कटू नका : चोरगे
जिल्हा बँक आपण गेल्या आठ वर्षांच्या काळात चांगल्या स्थितीत आणून ठेवली आहे. आता या बॅँकेत नवीन करण्याजोगे फारसे काहीच नाही. मात्र बसलेली घडी तशीच राखण्यासाठी आम्ही मतदारांसमोर पुन्हा जात आहोेत. चुकीच्या हाती बॅँक जाऊन बसलेली घडी विस्कटू नये, हीच आमची इच्छा आहे, असे मत बॅँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी व्यक्त केले.