जिल्हा आरोग्य अधिकारी धारेवर
By admin | Published: November 19, 2016 01:03 AM2016-11-19T01:03:26+5:302016-11-19T01:08:19+5:30
कणेरीवाडी आरोग्य उपकेंद्र वाद : सरपंचांसह, सदस्य, ग्रामस्थांना अटक व सुटका
कोल्हापूर : आरोग्य उपकेंद्रांची निविदा का उघडली नाही. कोणतरी एकटा सांगतोय म्हणून तुम्ही गावचे काम थांबवताय काय, असा जाब विचारत कणेरीवाडीचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांना शुक्रवारी दुपारी धारेवर धरले. या सर्वांचा आक्रमकपणा पाहून अखेर शाहूपुरी पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर या सर्वांना अटक करून नंतर सोडण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष खोत यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
आमदार सतेज पाटील गटाचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत आणि आमदार अमल महाडिक यांचे समर्थक यांच्यातील गावपातळीवरील वाद अशा पद्धतीने जिल्हा परिषदेत पोहोचला. याच विषयावरून खोत यांनी काही दिवसांपूर्वी ‘स्थायी’च्या सभेत डॉ. पाटील यांना शिवीगाळ केली होती.
कणेरीवाडी येथे आरोग्य उपकेंद्रासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची निविदा काढण्यात आली परंतु आपल्याला न विचारता ही निविदा कशी काढली, अशी विचारणा करत खोत यांनी डॉ. पाटील यांना शिवीगाळ केली होती.
खोत हे उपकेंद्राचे काम होऊ देत नाहीत, असा आरोप करीत दुपारी सरपंच पांडुरंग खोत, सदस्य प्रकाश खोत, पांडुरंग खोत, बाजीराव खोत, संतोष कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद खोत यांच्यासह ग्रामस्थ डॉ. पाटील यांच्या दालनामध्ये निवेदन देण्यासाठी आले. यावेळी त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही निविदा उघडली नाही, असा जाब डॉ. पाटील यांना विचारला. त्यानंतर वादावादी सुरू झाल्याने या सर्वांचा आक्रमकपणा पाहून शाहूपुरी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले हे डॉ. पाटील यांच्या दालनात आले. प्रशासन विभागाचा कार्यभार असलेले ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले यांच्यासह यावेळी चर्चा करण्यात आली. अखेर सर्वांना पोलिस गाडीत घालून शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
पाटील यांची कुचंबणा
जिल्हा परिषदेचे खोत हे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आहेत. त्यामुळे अमल महाडिक यांनी मंजूर केलेले उपकेंद्र गावात होऊ द्यायची नाही, अशी त्यांची भूमिका असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. यावरून त्यांनी डॉ. पाटील यांना धारेवर धरले, तर याआधीच्या स्थायी समिती सभेत खोत यांनी याच विषयावरून पाटील यांना शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांच्या राजकारणामध्ये डॉ. पाटील यांची कोंडी झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आरोग्य उपकेंद्रांच्या निविदेवरून पदाधिकारी यांच्यात वातावरण तणावपूर्ण बनल्याने शाहूपुरी पोलिसांना पाचारण केले. यामुळे पोलिस व्हॅन जिल्हा परिषदेच्या आवारात दाखल झाली होती.