‘सीपीआर’ला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा
By admin | Published: May 26, 2014 01:08 AM2014-05-26T01:08:06+5:302014-05-26T01:14:44+5:30
द्या बचाव कृती समितीची मागणी प्रधान सचिवांकडे
कोल्हापूर : ‘सीपीआर’ रुग्णालयाला पूर्ववत जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी ‘सीपीआर’ बचाव कृती समितीने केली होती, याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती कोल्हापूर मंडळाचे आरोग्य उपसंचालकांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिवांकडे केली आहे. सी.पी.आर. बचाव कृती समितीने जिल्हा रुग्णालय हे पूर्वीप्रमाणेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे सुरू राहून सर्व सेवा देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. १९ मे रोजी झालेल्या बैठकीत यावर चर्चा झालेली आहे. कृती समिती या मागणीवर ठाम आहे. जिल्हा रुग्णालयासाठी पूर्वीप्रमाणे शासनाकडून निधी उपलब्ध होऊन हृदयशस्त्रक्रिया विभागासाठी लागणारी यंत्रसामग्री व इतर विभागांतील यंत्रसामग्री सुस्थितीत ठेवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून मिळावा. जिल्ह्यातील बहुजणांचे भावनिक नाते या दवाखान्याशी जोडलेले आहेत. अशा भावना सीपीआर बचाव कृती समितीच्या आहेत. याबाबत गांभीर्याने विचार न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे, असे उपसंचालकांनी प्रधान सचिवांना केलेल्या विनंती पत्रात म्हटले आहे.(प्रतिनिधी)