ऑक्सिजन वितरण, नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:13+5:302021-04-02T04:25:13+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी तसेच ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांतून होणारे वितरण व ...
कोल्हापूर : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी तसेच ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांतून होणारे वितरण व पुरवठा नियंत्रित करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, येत्या काही दिवसांत मेडिकल ऑक्सिजनची गरज अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गंभीर रुग्णांच्या उपचारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनाने राज्यातील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांतून होणारे वितरण व पुरवठा नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. बाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचारादरम्यान ऑक्सिजन उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादन, पुरवठा, वाहतूक, ऑक्सिजनचा प्रोटोकॉलनुसार योग्य वापर करून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी समितीमार्फत कामकाज केले जाणार आहे.
या समितीकडून दैनंदिन ऑक्सिजनची गरज व ती पुरविणारे उत्पादन व वितरक यांच्या सतत संपर्कात राहून प्रत्येक शासकीय व खासगी रुग्णालयात वेळेत ऑक्सिजन मिळेल याची दक्षता घेतली जाणार आहे. ऑक्सिजनचा उत्पादन व साठा करणाऱ्या आस्थापना व त्यावर सनियंत्रणासाठी नियुक्त अधिकारी, कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड सेंटर, समर्पित कोविड सेंटर या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण व समन्वय करण्याचे काम करतील.
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.
---
नियुक्त अधिकारी व दिलेली जबाबदारी
- निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे : सर्व कार्यालयांशी समन्वय व नियोजन
- सपना कुपेकर, मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, : उत्पादकांशी समन्वय व ऑक्सिजन उपलब्धतेचे नियोजन.
-धनाजी इंगळे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी : जिल्ह्यातील एमआयडीसीतील पुरवठादार- उत्पादक यांच्यावर नियंत्रण व शासकीय रुग्णालयांना पुरवठा.
- सतीश शेळके, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, : एमआयडीसी क्षेत्र वगळून उर्वरित पुरवठादार-उत्पादक यांच्यावर नियंत्रण व शासकीय रुग्णालयांना पुरवठा
- स्टीव्हन अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी : वाहतूक व टँकर समन्वय
- डॉ. हर्षला वेदक, निवासी वैद्यकीय अधिकारी : नगरपालिका क्षेत्रातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील मागणी व पुरवठा सुरळीत ठेवणे.
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्याधिकारी : ग्रामीण भागातील कोविड सेंटरमधील मागणी व पुरवठा सुरळीत ठेवणे.
- डॉ. अशोक पोळ, मुख्य आरोग्याधिकारी : महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी व शासकीय रुग्णालयांतील मागणी व पुरवठा सुरळीत ठेवणे.
--