जिल्हास्तरीय आरोग्य अधिकारी सुट्टीदिवशी ग्रामीण भागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:23 AM2021-04-14T04:23:04+5:302021-04-14T04:23:04+5:30
कोल्हापूर : एखादा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गतवर्षीसारखी कार्यपद्धती अवलंबण्यात ...
कोल्हापूर : एखादा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गतवर्षीसारखी कार्यपद्धती अवलंबण्यात येत नसल्याबद्दल ‘लोकमत’ने मंगळवारी वस्तुस्थिती मांडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सुट्टीदिवशीही ग्रामीण भागात धाव घेतली. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना नेमकी काय प्रक्रिया करावी याबाबतही तातडीने सूचना करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी नागरिक पॉझिटिव्ह आल्यानंतर सॅनिटायझेशन करणे, दारावर स्टीकर लावणे, तातडीने कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करणे ही प्रक्रिया राबवण्यात येत होती. मात्र, आता या प्रक्रियेमध्ये शैथिल्य आल्याचे या वृत्तामध्ये मांडण्यात आले होते.
यानंतर सकाळीच जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. याेगेश साळे यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून नेमके काय केले पाहिजे या सूचना दिल्या. तसेच त्यांनी मोरेवाडी, पाचगाव, आर. के. नगर, कळंबा, गोकुळ शिरगाव आदी गावांना भेटी दिल्या. या ठिकाणी गृह अलगीकरणामध्ये राहात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी भेट देऊन तेथे रुग्णाची कशा पद्धतीने काळजी घेतली जाते याची चौकशी केली. तसेच सोबतच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि ग्रामपंचायतीशी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
माता, बालआरोग्य संगेापन अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनीही शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव, बांबवडे, सरूड गावांना भेटी दिल्या. या परिसरातील बहुतांशी कोविड पॉझिटिव्ह रुग्ण हे माण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचीही माहिती घेतली.
चौकट
‘लोकमत’च्या बातमीनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिलेल्या सूचना
१ आपल्याकडील गृह अलगीकरणाच्या नागरिकांची काळजी घेतली का?
२ त्यांची दररोज दोनवेळा फोनद्वारे विचारणा करावी.
३ रुग्णांचा ताप आणि ऑक्सिजन पातळीची नोंद ठेवावी.
४ दरवाजावर स्टीकर लावावे.
५ रुग्णाची काळजी घेणाऱ्यास मार्गदर्शन करावे.
६ रुग्णाकडे आवश्यक असा किट द्यावा.
७ अशा रुग्णाचे घर दोनवेळा निर्जंतुकीकरण करण्यास सांगावे.
८ रुग्णास स्वतंत्र खोली आणि अटॅच टॉयलेट असल्याची खात्री करावी.
९ प्रत्येक रुग्णाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतः निरीक्षण करावे आणि त्याची नोंद ठेवावी.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय योग्यच...
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. मात्र, २४ तासांत त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला; परंतु मुंबई, पुण्याहून पुन्हा नागरिक गावकडे येऊ लागले आहेत. ग्रामसमित्या अजूनही म्हणाव्या तितक्या सक्रिय झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी हा धोका लक्षात घेऊनच कोरोना चाचणीचा निर्णय सक्तीचा केला होता व तो योग्यच होता, असे म्हणण्याची पाळी आता येणार आहे.
१३०४२०२१ कोल महापालिका
कोल्हापूर महापालिका गृह अलगीकरणमध्ये रुग्ण असलेल्या घरावर अशा पद्धतीने स्टीकर लावत असल्याची माहिती आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.