परुळेकर, पवार यांना जिल्हास्तरीय युवा पुरस्कार
By admin | Published: May 1, 2015 12:28 AM2015-05-01T00:28:51+5:302015-05-01T00:31:20+5:30
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज, शुक्रवारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : राज्य क्रीडा कार्यालयाच्यावतीने देण्यात येणारे जिल्हास्तरीय युवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. श्वेता परुळेकर हिला ‘युवती पुरस्कार’, तर अजित पवार यास ‘युवा पुरस्कार’ जाहीर झाला असून, संस्था गटातून सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील कै. शिवाजीराव पाटील बहुउद्देशीय ग्रामविकास प्रबोधिनी संस्थेचाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज, शुक्रवारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे ‘युवा धोरण २०१२’ अनुषंगाने धोरणातील शिफारशीनुसार जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ ते ३५ वयोगटांतील युवक-युवतींना व स्वयंसेवी संस्थांना जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित केले जाते. कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, व्यसनमुक्ती, पर्यावरण, स्त्रीभ्रूण रक्षण आदींविषयी, युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य क्रीडा कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय ‘युवा पुरस्कार’ देण्यात येतात.
यावर्षी श्वेता परुळेकर व अजित पवार यांचा गौरव करण्यात येणार आहे, तर संस्था गटातून सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील कै. शिवाजीराव पाटील बहुउद्देशीय ग्रामविकास प्रबोधिनी या संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात येणार आहे.
युवक व युवती पुरस्कारासाठी दहा हजार, तर संस्था गटासाठी पन्नास हजार रुपये व गौरवपत्र, सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.