जिल्हास्तरीय युवा महोत्सव ऑनलाईन रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:57+5:302021-07-14T04:26:57+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शिवाजी विद्यापीठाने यावर्षी जिल्हास्तरीय आणि मध्यवर्ती युवा महोत्सव ऑनलाईन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. ...
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शिवाजी विद्यापीठाने यावर्षी जिल्हास्तरीय आणि मध्यवर्ती युवा महोत्सव ऑनलाईन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचा ४० वा. युवा महोत्सव सोमवारी ऑनलाईन सुरू झाला. त्यात विविध १९ कला प्रकारांमध्ये ४५० स्पर्धेक सहभागी झाले. यजमानपदाचा बहुमान मिळालेल्या शहरातील न्यू कॉलेजने या महोत्सवाचे संयोजन केले. या महोत्सवाचा बुधवारी समारोप होणार आहे.
या जिल्हास्तरीय महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. अध्यक्षस्थानी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष के. जी. पाटील होते. कोरोनामुळे विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने युवा महोत्सव होत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महोत्सव आयोजित केला आहे. उत्तम आरोग्यामुळे कलांचा आस्वाद घेऊन आपले जीवन अधिक समृद्ध करू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेऊन कलाप्रकारांचा आविष्कार घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले. भविष्यात विद्यापीठ आणि न्यू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन के. जी. पाटील यांनी केले. युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी घेतला. न्यू कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पहिला ऑनलाईन युवा महोत्सव आयोजित करण्याची जबाबदारी मिळाल्याचा आनंद असल्याचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी सांगितले. आर. डी. ढमकले यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य ए. एम. शेख यांनी आभार मानले. दरम्यान, उद्घाटनानंतर रांगोळी स्पर्धेने महोत्सवाची सुरुवात झाली. मराठी, हिंदी वक्तृत्व, शास्त्रीय गायन, नृत्य, सूरवाद्य आणि व्यंगचित्र स्पर्धा रंगली. त्यात सुमारे १२५ स्पर्धेक सहभागी झाले.
चौकट
सादरीकरण, परीक्षण ऑनलाईन
न्यू कॉलेजने दिलेल्या ऑनलाईन लिंकवर जॉईन होऊन स्पर्धकांनी त्यांची कला सादर केली. परीक्षकांनी त्याचे ऑनलाईन परीक्षण करून गुणांची नोंद केली. कला प्रकारनिहाय संयोजनासाठी न्यू कॉलेजने विविध सात पथके कार्यरत ठेवली होती, असे आर. व्ही. गुरव यांनी सांगितले. दरम्यान, या महोत्सवात आज, मंगळवारी सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन या वेळेत भित्तीचित्र, एकपात्री अभिनय, सुगमगायन, पाश्चिमात्य वाद्यवादन, कातरकाम, मेहंदी स्पर्धा होणार आहेत.