शिवाजी विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाची साताऱ्यातून सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 03:52 PM2018-10-19T15:52:08+5:302018-10-19T15:54:15+5:30
शिवाजी विद्यापीठाने नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन केल्याने युवा महोत्सव घेण्याचा मार्ग मोकळा झाला. यावर्षीचा विद्यापीठाचा ३८ वा मध्यवर्ती युवा महोत्सव सांगलीमध्ये दि. ३१ आॅक्टोबर ते दि. २ नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. जिल्हास्तरीय महोत्सवाची सुरूवात यावर्षी सातारा येथून दि. २६ आॅक्टोबरपासून होणार आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन केल्याने युवा महोत्सव घेण्याचा मार्ग मोकळा झाला. यावर्षीचा विद्यापीठाचा ३८ वा मध्यवर्ती युवा महोत्सव सांगलीमध्ये दि. ३१ आॅक्टोबर ते दि. २ नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. जिल्हास्तरीय महोत्सवाची सुरूवात यावर्षी सातारा येथून दि. २६ आॅक्टोबरपासून होणार आहे.
या महोत्सवाचे नियोजन विद्यापीठाने सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात जाहीर केले. मात्र, त्याच दरम्यान प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू झाले. या आंदोलनामुळे यजमान महाविद्यालयांनी महोत्सव घेणे शक्य नसल्याचे विद्यापीठाला पत्राद्वारे कळविले. त्यावर विद्यापीठाने महोत्सव पुढे ढकलला.
गेल्या दोन दिवसांपूर्वी विद्यापीठाने पहिल्या सत्रातील परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला. त्यामुळे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाने महोत्सवाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार सातारा जिल्ह्याचा महोत्सव कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयात दि. २६ आॅक्टोबर रोजी, कोल्हापूर जिल्ह्यातील महोत्सव दि. २७ आॅक्टोबरला महावीर महाविद्यालयात होईल.
सांगली जिल्ह्याचा महोत्सव दि. २९ आॅक्टोबरला आटपाडीतील बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात होणार आहे. मध्यवर्ती युवा महोत्सव सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात दि. ३१ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. या वर्षीचा राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ महोत्सव डिसेंबरमध्ये नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाची संघ निवड चाचणी ३ आणि ४ नोव्हेंबरला विद्यापीठात होणार आहे.
विविध कलाप्रकारांतील स्पर्धा
एकांकिका, लोकनृत्य, लोककला वाद्यवृंद, लघुनाटिका, पथनाट्य, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा, मूकनाट्य, वादविवाद या स्पर्धा जिल्हास्तरीय युवा महोत्सवात होतील. या स्पर्धांसह शास्त्रीय नृत्य, व्यंगचित्र, भित्तिचित्र, कोलाज, मातीकाम, रांगोळी, स्थळचित्रण, छायाचित्रण, शास्त्रीय गायन, सुगम गायन, पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य समूहगीत, भारतीय समूहगीत, नकला, एकपात्री, शास्त्रीय सूरवाद्य, तालवाद्य या स्पर्धा मध्यवर्ती महोत्सवामध्ये होणार आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय महोत्सव होईल. त्यातील विविध स्पर्धांमधील पहिल्या तीन क्रमांकांचे विजेते मध्यवर्ती महोत्सवात सहभागी होणार आहेत. जिल्हा पातळीवरील महोत्सवात विविध कलाप्रकारांतील १४ आणि मध्यवर्तीमध्ये ३२ स्पर्धा होतात. यावर्षी ‘मेहंदी’ या कलाप्रकाराची स्पर्धा समाविष्ट केली आहे. महोत्सवाची तयारी सुरू असल्याचे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी सांगितले.