जिल्हा उपनिबंधक घेणार अवसायकांची झाडाझडती बैठक मंगळवारी : बँकांच्या अवसायकांचाही घेणार आढावा--लोकमत इफेक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:14 AM2018-01-14T01:14:12+5:302018-01-14T01:14:30+5:30
कोल्हापूर : ‘भुदरगड’, ‘तपोवन’, ‘मानिनी’सह पाच अवसायनातील पतसंस्थांच्या कामकाजाची मंगळवारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे झाडाझडती घेणार आहेत.
कोल्हापूर : ‘भुदरगड’, ‘तपोवन’, ‘मानिनी’सह पाच अवसायनातील पतसंस्थांच्या कामकाजाची मंगळवारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे झाडाझडती घेणार आहेत. पतसंस्थांसह अवसायनातील बॅँकांचाही आढावा घेतला जाणार असून, केवळ चालढकल करणाºया अवसायकांवर थेट कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
आयुष्यभर काबाडकष्ट करून जमविलेली पुंजी भविष्यासाठी मोठ्या विश्वासाने पतसंस्थांमध्ये ठेवली. आपल्या आजूबाजूची माणसेच या संस्थांचे कारभारी असल्याने ठेवीदार निर्धास्त होते; पण जवळच्या माणसांच्या कारनाम्याने संस्था अडचणीत आल्या आणि ठेवीदार अडकले. कोणत्याही वित्तीय संस्थेचा ठेवीदार हा आत्मा असतो. त्याच्या जिवावरच संस्थेची उलाढाल होऊन प्रगती होते; पण आत्म्यावरच डल्ला मारण्याचे काम काही संस्थाचालकांनी केल्याने सहकारावरील विश्वासार्हता संपत चालली आहे. ठेवीदारांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यात बदल झाला; पण त्याची कडक अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच संस्थांमध्ये गैरव्यवहार करण्यास बळ मिळत आहे. अवसायक नेमल्यानंतर वास्तविक उपनिबंधकांनी दर दोन महिन्याला त्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे अपेक्षित असते; पण वर्षात एकदा तरी आढावा घेतला जातो का? हा खरा संशोधनाचा विषय आहे.
भुदरगड नागरी, तपोवन व मानिनी पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या वेदना (‘मरणयातना ठेवीदारांच्या’) ‘लोकमत’ने मांडल्या होत्या. त्याची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी पतसंस्था अवसायकांची मंगळवारी तातडीची बैठक बोलाविली आहे. पतसंस्थांच्या अवसायकांनी केलेल्या कामाचा आढावा ते घेणार आहेत. थकीत कर्जाची वसुली किती केली, वसुलीसाठी कोणती विशेष मोहीम राबविली, ठेवीदारांचे किती पैसे दिले, त्यामध्ये प्राधान्यक्रम कसा लावला, यासह विविध मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे.
संस्थाचालकांचा उजळ माथा !
कारभाºयांच्या प्रतापाने संस्था बुडाल्या आणि ठेवीदारांच्यावर उपासमारीची वेळ आली. लग्नकार्य, औषधपाण्यासाठी लोकांकडून उसने घेतलेले पैसे परत न गेल्याने त्यांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे; पण ज्यांनी ठेवीदारांना भिकेला लावले, ते कारभारी व त्यांचे कुटुंबीय सामाजिक व राजकीय क्षेत्रात उजळमाथ्याने फिरत आहेत.
भुदरगडसह पाच पतसंस्थांच्या अवसायकांची मंगळवारी बैठक आयोजित केली आहे. यामध्ये आढावा घेऊन ज्यांनी अपेक्षित काम केले नाही, त्यांच्याबाबत उचित कार्यवाही केली जाईल.
- अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक
या संस्थांचा घेतला जाणार आढावा
भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था , मानिनी नागरी सहकारी पतसंस्था तपोवन सहकारी पतसंस्था बाबूराव महाजन राजीव नागरी पतसंस्था