जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली स्थगिती लपविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:54 PM2018-07-04T23:54:34+5:302018-07-04T23:54:38+5:30
इचलकरंजी : शहरातील मालमत्तांसाठी घरफाळ्यामध्ये झालेली वाढ कमी करण्याबाबत नगरपालिका संचालकांनी निर्णय देईपर्यंत नगरपालिकेकडील कर विभागाने घरफाळ्याची बिले वितरित करू नयेत, अशा आशयाच्या ठरावाला जिल्हाधिकाºयांनी स्थगिती दिली. या पत्राची प्रत नगराध्यक्षांना मिळूनसुद्धा त्यांनी पालिका सभागृहासमोर माहिती दिली नाही. म्हणजे घरफाळावाढीला सत्तारूढ गटाचे समर्थन आहे, अशा आशयाची टीका कॉँग्रेस व राजर्षी शाहू विकास आघाडीच्यावतीने बुधवारी केली आहे.
दरम्यान, विरोधी कॉँग्रेस व शाहू आघाडीने केलेला आरोप भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी फेटाळला असून, तो राजकीय द्वेषाने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
येथील नगरपालिका हद्दीमधील मालमत्तांना लागू झालेल्या चतुर्थ कर आकारणीमधील घरफाळा वाढीसंदर्भात १८ जून रोजी विशेष सभा झाली होती. सभेमध्ये चर्चा होऊन घरफाळा वाढीसंदर्भात नगरपालिका संचालकांकडे दाद मागण्यात येईल आणि त्याचा निर्णय होईपर्यंत किंवा ३१ जुलैपर्यंत घरफाळ्याची बिले वितरित करू नयेत, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाला मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी जिल्हाधिकाºयांकडे स्थगिती मागितली होती. त्याप्रमाणे जिल्हाधिकाºयांनी स्थगिती दिलेले पत्र नगराध्यक्षांना २९ जून रोजी प्राप्त झाले. त्यानंतर ३० जून रोजी झालेल्या नगरपालिका सभेमध्ये स्थगिती मिळाल्याची बाब नगराध्यक्षांनी सभागृहासमोर ठेवली नाही. याचा अर्थ सत्तारूढ आघाडीला घरफाळावाढीचे समर्थन करावयाचे आहे, असा होत असून, त्याचा कॉँग्रेस व राजर्षी शाहू विकास आघाडी निषेध करीत आहे, अशी माहिती नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे.
विरोधकांचा आरोप राजकीय द्वेषातून : पोवार
दरम्यान, सत्तारूढ आघाडीतील भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी, विरोधकांनी केलेला आरोप राजकीय द्वेषातून असून, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून केला आहे, असे एका पत्रकाद्वारे म्हटले आहे. तसेच घरफाळावाढ रद्द व्हावी म्हणून नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी नगरपालिका आयुक्त तथा नगरपालिका प्रशासन संचालक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे, असेही पोवार यांनी पत्रकात नमूद केले आहे.