Kolhapur: आपत्ती प्रवण गावातील तलाठी, ग्रामविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावात राहा - प्रांताधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 04:05 PM2023-07-24T16:05:21+5:302023-07-24T16:12:59+5:30
'ग्रामस्थांना अडचण येणार नाही याची खबरदारी प्रशासन घेईल'
आयुब मुल्ला
खोची: आम्ही पगार घेतोय. आमचं कर्तव्य पार पाडावेच लागेल. आपत्ती प्रवण गावात काम करणाऱ्या तलाठी, ग्रामविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी गावात राहिलेच पाहीजे. कसलीही हयगय करून चालणार नाही अशा कडक सूचना प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांनी दिल्या. ग्रामस्थांना अडचण येणार नाही याची खबरदारी प्रशासन घेईल असा विश्वास त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला.
भेंडवडे, खोची येथे संभाव्य पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रांताधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजावून घेत संवाद साधला. भेंडवडे लाटवडे रोडवरील पुलाजवळ आलेल्या पाण्याची तसेच प्राथमिक शाळेची पाहणी केली. खोची येथे प्राथमिक शाळेत बैठक घेत सूचना केल्या. यावेळी भेंडवडे येथील ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र याची दुरावस्था ग्रामपंचायत सदस्य यांनी लक्षात आणून दिली. यावर लवकर हा प्रश्न सोडविला जाईल असेही प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.
तहसीलदार कल्पना ढवळे म्हणाल्या, प्रशासन सज्ज असून महसूल विभागाने गत वेळेच्या महापुराचा अभ्यास करून नागरिकांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांची राहण्याची व्यवस्था, जनावरांची शेडची व्यवस्था या अनुषंगाने नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
यावेळी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रवींद्र जंगम, तलाठी प्रवीण तोडकर, ग्रामविकास अधिकारी डी.आर.देवकाते, उत्तम पाटील तसेच खोची येथे सरपंच अभिजित चव्हाण, तलाठी प्रमोद पाटील, उपस्थित होते.