जि. प. निवडणुकीचा बिगुल वाजला
By admin | Published: January 4, 2017 12:25 AM2017-01-04T00:25:57+5:302017-01-04T00:25:57+5:30
मतदार यादी २१ ला प्रसिद्ध : १२ ते १७ जानेवारी हरकतीची मुदत
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. एक जानेवारी २०१७ हा अर्हता दिनांक धरून तयार करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्हा
परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक ५ जानेवारी २०१७ असून विधानसभेच्या मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकींकरिता तयार केलेली मतदार यादी १२ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवसापासून १७ जानेवारीच्या संध्याकाळी साडेपाचपर्यंत हरकती घेता येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या ‘कलम १३’ खाली छापील मतदार
याद्या माहितीसाठी २१ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
१ जानेवारी २०१७ हा अर्हता दिनांक धरून विधानसभा मतदार यादीचे विभाजन १६ सप्टेंबर २०१६ ला भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली प्रारूप मतदार यादी व १ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर १६ सप्टेंबरनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेऊन भारत निवडणूक आयोगातर्फे प्रसिद्ध होणारी ५ जानेवारी २०१७ ची पुरवणी यादी असेल. या पुरवणी यादीचे प्रभागनिहाय विभाजन ७ जानेवारी २०१७ पर्यंत केले जाईल.
जिल्ह्यातील विधानसभा मतदार यादीत स्थानिक स्वराज्य संस्थेत समाविष्ट असलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान ठेवली जाणार आहे. (प्रतिनिधी)
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम१ जानेवारी २०१७ हा अर्हता दिनांक विधानसभेची जी मतदार यादी तयार करण्यात आली आहे ती वापरली जाणार.
पुरवणी यादीचा समावेश असलेली यादी तयार करण्यात येईल
१२ जानेवारीला तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी या मतदार याद्या पाहण्यास मिळतील.
१७ जानेवारीच्या संध्याकाळी साडेपाचपर्यंत यादीवर हरकती घेता येतील.