जि. प. सभेत हद्दवाढीला विरोध
By admin | Published: March 15, 2016 01:01 AM2016-03-15T01:01:22+5:302016-03-15T01:01:22+5:30
हद्दवाढ प्रश्न : लक्ष वेधले; ‘गावे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’ घोषणा
कोल्हापूर : ‘गावे आमच्या मालकीची, नाही कोणाच्या बापाची’ अशी घोषणा देत जिल्हा परिषदेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावित हद्दवाढीला विरोध झाला. विरोधाचे घोषवाक्य लिहिलेली टोपी घालून बाजीराव पाटील, विलास पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
हद्दवाढीला विरोध करताना बाजीराव पाटील म्हणाले, महापालिकेने हद्दवाढीचा ठराव करून शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. प्रस्तावित हद्दवाढ झाल्यास १८ गावांचा समावेश होणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. ग्रामीण भागातील लोकांची शहरात येण्याची मानसिकता नाही. शहरात आल्यानंतर शेती, उद्योग उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे सभागृहाने हद्दवाढीला विरोध करावा.
अरुण इंगवले यांनी सन १९७२ मध्ये झालेल्या तलावांच्या मालकीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, तलाव संबंधित शेतकऱ्यांच्या नावे आहेत. यापूर्वी मी सातत्याने जिल्ह्यातील सर्व तलावांचा सर्व्हे करा, सात-बारावर जिल्हा परिषदेची नावे लावा, अशी मागणी केली; परंतु, अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम केले आहे. त्यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पूर्ण खुलासा ऐकून न घेताच इंगवले यांनी प्रश्नांचा भडिमार सुरू ठेवला. जिल्हा परिषदेच्या अनेक मालमत्ता दुसऱ्यांच्या नावे आहेत, त्यांचा कधीतरी विचार करा, असा सल्लाही इंगवले यांनी दिला.
(हॅलो ८ वर)
एम्पती फौंडेशनचा सत्कार..
जिल्ह्यातील शाळा इमारत बांधकाम करण्यासाठी एम्पती फौंडेशनने ७ कोटी ९५ लाख रुपये खर्च केले आहेत. त्याबद्दल ‘एम्पती’चे अध्यक्ष व आयएसओ मानांकन मिळविलेल्या प्राथमिक शाळांचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
टोपी काँग्रेसची...
हद्दवाढ विरोधाचे घोषवाक्य लिहिलेली पांढरी टोपी परिधान करून शिवसेनेचे सदस्य बाजीराव बोलत होते. त्यावेळी राजेंद्र परीट यांनी बाजीराव यांच्याकडे पाहत डोक्यावर ‘काँग्रेसची टोपी’ आहे, असा टोला लगावताच सभागृहात एकच हशा पिकला.