जि. प. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:28 AM2018-06-04T00:28:09+5:302018-06-04T00:28:09+5:30
आजरा : सव्वा वर्षाचा कालखंड संपल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी राजीनामा द्यावा. शिवसेना आमच्याबरोबर आहे. राजीनामा दिल्यानंतर पुढची व्यूहरचना आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.
आजरा येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील आप्पासाहेब कल्लाप्पा पाटील, पत्नी महानंद व नूतन नगरसेवक, सरपंच, सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते.
पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या काळात पेट्रोल ९० रुपयांपर्यंत गेले. घरगुती गॅसचा दर वाढला. समाजातील कोणताही घटक समाधानी नाही. शेतकरी अडचणीत आहे. त्याचबरोबर रोजगार उपलब्ध होत नसल्याने तरुणाई हवालदिल आहे.
आजरा नगरपंचायत जिंकल्यामुळे सत्ताधाऱ्यांना जग जिंकल्यासारखे वाटते. लोकसभा निवडणुकीत १४ पैकी ११ ठिकाणी भाजपचा पराभव झाला. काँगे्रसच्या काळात पोलीस पाटलांचे मानधन ८०० रुपयांवरून ३००० केले. एक वर्षानंतर आजरा शहराच्या विकासासाठी निधी देणार आहे.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, विस्थापितांच्या पुनर्वसनानंतर सुंदर वसाहत करण्याचे काम आप्पासाहेब पाटील यांनी केले. जातीयवादी शक्ती प्रबळ होत असल्याने पुरोगाम्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.
यावेळी माजी उपसरपंच अशोक पोवार, पोलीस पाटील संघटनेचे संस्थापक भगवान पाटील, आप्पासाहेब पाटील, सभापती रचना होलम यांची भाषणे झाली. यावेळी नगरसेवक, सरपंच, सदस्य यांचा सत्कार झाला.
याप्रसंगी जि. प. सदस्य जयवंत शिंपी, मुकुंद देसाई, विद्याधर गुरबे, राजू होलम, रवींद्र भाटले, बशीर खेडेकर, उदयराज पोवार, भैया कोंडके, भिकाजी गुरव, सीमा पोवार, आदी उपस्थित होते.
धर्मांध शक्तीला विरोध
देशात धर्मांध शक्ती वाढत आहे. अशा काळात आमच्या विचाराच्या नऊ ग्रामपंचायतींत सत्ता आली आहे. परिवर्तन होत असल्याने एकत्र येण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी सांगितले.
एकदा चुकलो, पुन्हा नाही
बारामतीकराचं बंटीसाहेब ऐकतात असे वक्तव्य के. पी. पाटील यांनी केले. या वक्तव्याचा धागा पकडत बारामतीकरांचं एकदा ऐकून चूक केली, पुन्हा बारामतीकरांचं ऐकणार नसल्याचे आमदार सतेज पाटील म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.