नेते ‘नियोजन’ला.. कार्यकर्ते पोस्टर लावायला, कोल्हापुरात भाजपमध्ये संतप्त पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 12:40 PM2022-12-24T12:40:30+5:302022-12-24T12:54:36+5:30
जिल्हा नियोजन समिती निवडीवरुन भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता
कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीवर भाजपकडून नेत्यांनाच संधी दिली गेल्याने महानगर आणि ग्रामीणचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. शुक्रवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या दोन स्वतंत्र बैठकीमध्ये याचे पडसाद उमटले. कार्यकर्त्यांनी नेत्यांनाच थेट जाब विचारला. मात्र, उत्तरे देताना नेत्यांची कुचंबणा झाली. नेते सारे ‘नियोजन’ला.. आणि कार्यकर्ते खळ पोस्टरला लावायला, काय अशी संतप्त विचारणा झाली.
गुरूवारी नियोजन समितीची नावे जाहीर झाली. यामध्ये भाजपचे सात सदस्य आहेत; परंतु त्यातील पाच जण नेते आहेत. ही नावे वाचल्यानंतर गुरुवारी रात्रीपासूनच भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. अशातच शुक्रवारी सकाळी १० वाजता ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वाजपेयी यांची जयंती, मन की बात आणि पक्षाच्या अन्य उपक्रमांबाबत चर्चा झाल्यानंतर अल्केश कांदळकर यांनी समिती निवडीच्या विषयाला तोंड फोडले.
संभाजी आरडे, सुधीर कुंभार, राजेश पाटील, अजय चौगले यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला. पक्षाचे कार्यक्रम करण्याकरिता, मन की बात कार्यक्रमासाठी, सेवा सप्ताहासाठी तुम्हाला कार्यकर्ते पाहिजेत. मग या नेत्यांनाच घेऊन तुम्ही कार्यक्रम करा, असे स्पष्ट शब्दांत यावेळी नेत्यांना सुनावण्यात आले. पक्षाने दिलेल्या कार्यक्रमावेळी यातील कोणीही नसतात, आम्ही सामान्य कार्यकर्ते हे कार्यक्रम करतोय हे लक्षात घ्या, असेही बजावण्यात आले.
दुपारनंतर भाजपच्या बिंदू चौकातील शहर कार्यालयात बैठक झाली. याही बैठकीत गोंधळ झाला. महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी कोणत्या निकषावर तुम्ही नियोजन समितीचे सदस्य निवडले असा प्रश्न उपस्थित केला. विशेष कार्यकारी अधिकारी करताना निकष लावले, मग इथे कोणते लावले. बाहेरून आलेल्यांना पदे दिली गेली. विजय जाधव, अशोक देसाई, गणेश देसाई, सचिन तोडकर, हेमंत आराध्ये यांच्यासह कार्यकर्त्यांनी आपली स्पष्ट मते मांडली.
देशपांडे खिंडीत
संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी मकरंद देशपांडे हे या बैठकीसाठी आले होते. घाटगे यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर अशोक चराटी निघून गेले. घाटगे, अमल महाडिक, शौमिका महाडिक हे तेथून उठून आत जाऊन बसले. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी बैठकीकडे येणेच टाळले. कारण त्यांना गुरुवारीच कार्यकर्त्यांनी फोन करून याबाबत विचारणा करणार असल्याची कल्पना दिली होती. शहर कार्यालयातही हा विषय उपस्थित झाल्यानंतर काम आहे असे सांगून अमल महाडिक बाहेर पडले. दोन्हीकडे मकरंद देशपांडे मात्र खिंडीत सापडले.
कार्यकर्त्यांची कुचंबणा
ही यादी मंत्री चंद्रकांत पाटील यांना न दाखवता निश्चित केली नाही हे विचारणा करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही माहीत आहे; परंतु यामध्ये जे विधानसभेला उभारणार आहेत, उभारले आहेत त्यांना संधी दिली आहे. मग कार्यकर्त्यांना संधी का दिली गेली नाही अशी त्यांची भावना आहे; परंतु पाटील यांनीच या यादीला मान्यता दिली असेल तर तक्रार करायची तरी कोणाकडे असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर आहे.
प्रस्थापितांनाच संधी..
भाजपचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष पुंडलिक बिरंजे चांगलेच संतापले. माजी आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण संस्थाचालक अशा नेत्यांना नियोजन समितीवर संधी देण्यात आली आहे. मग कार्यकर्त्यांनी फक्त नेत्यांच्या पाठीमागून फिरायचे आणि पोस्टरला खळच लावायची काय.. भविष्यात कार्यकर्ता मोठाच होऊ नये यासाठीची ही पद्धतशीर व्यवस्था असल्याचा आरोप बिरंजे यांनी केला.
सबकुछ माल अंदर...
जिल्हा नियोजन मंडळावर नियुक्त झालेल्या नेत्यांची ‘सबकुछ माल अंदर...’ अशी वृत्ती असल्याची तिखट प्रतिक्रिया एका कार्यकर्त्यांने स्वत:हून ‘लोकमत’ला फोन करून व्यक्त केली. तो म्हणाला, ‘आंदोलने आम्ही करायची, गुन्हे आमच्यावर दाखल होणार आणि सत्तेचा लाभ घ्यायला मात्र प्रस्थापित लोक पुढे, असे घडले आहे. विधानसभेला हेच, साखर कारखाना, दूध संघ, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीलाही हेच; मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत रक्षाविसर्जन झाल्यावर काय फक्त जागाच सारवायच्या का..? याचाही विचार पक्षाने करावा.’
२० सदस्यांच्या समितीत कुणाला किती संधी..?
भाजप - ०६
प्रकाश आबिटकर गट - ०३
विनय कोरे : ०२
खासदार संजय मंडलिक : ०२
खासदार धैर्यशील माने : ०२
पालकमंत्री दीपक केसरकर : ०१
राजेश क्षीरसागर : ०१
माजी खासदार संभाजीराजे : ०१
राजेंद्र यड्रावकर : ०१
प्रकाश आवाडे : ०१