..म्हणजे मुश्रीफ घाबरल्याचा जणू पुरावाच; व्ही.बी.पाटील यांचे प्रत्युतर
By विश्वास पाटील | Published: September 9, 2024 07:29 PM2024-09-09T19:29:23+5:302024-09-09T19:30:24+5:30
गद्धारी गाडणे यालाच प्राधान्य
कोल्हापूर : कागलच्या गैबी चौकातील सभेत मी केलेले भाषण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना चांगलेच झोंबलेले दिसते. भैया माने यांच्याकडून त्यांनी माझ्यावर केलेली टीका म्हणजे मुश्रीफ घाबरल्याचा जणू पुरावाच असल्याचे प्रत्युतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिले.
कागल आणि जिल्हा बँकेचा मला कायमच द्वेष असल्याची टीका मुश्रीफ यांच्या आडून भैय्या माने यांनी करणे म्हणजे सौ चुहे खा के..या प्रकारातील आहे. मुश्रीफ यांना राजकारणात ज्यांनी मोठं केलं त्या शामराव भिवाजी पाटील, विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक आणि आता शरद पवार यांना मुश्रीफ यांनी निव्वळ सत्तेच्या लाभासाठी टांग मारली. मंडलिक यांचे राजकारण संपवायला निघालेल्या या राक्षसी माणसाला कागलच्या जनतेने मंडलिक कारखाना, लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांची मंडलिक यांच्याशी भेट होऊ नये हे कारस्थान केले होते. ज्यांनी गोकुळच्या निवडणुकीत अंबरीश घाटगे यांना उमेदवारी मिळू नये आणि वीरेंद्र मंडलिक व आमदार राजेश पाटील यांची पत्नी अर्थात मंडलिक साहेबांची कन्या हे दोघे निवडून येऊ नयेत यासाठी सगळी ताकद पणाला लावलीत असे षडयंत्र करणाऱ्याच्या तोंडी कागलच्या हिताची भाषा शोभत नाही.
'या निवडणुकीत तुमचा हिशोब चुकता करणार'
ज्यांना तुम्ही माझ्यावर टीका करायला लावली ते भैया माने हे विधानसभा निवडणुकीपर्यंत तुमच्याकडे राहतील काय? हीच शंका आहे. कारण या निवडणुकीत अनेकजण तुमचा हिशोब चुकता करणार आहेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हा भस्मासूर कागलची जनता यावेळेला नक्कीच गाडणार आहे. राहिला विषय जिल्हा बँकेचा, तिथे आपण काय उद्योग केले आहेत आणि कुणाचे खिसे भरले आहेत याचा पाढा पत्रकार परिषद घेऊन करणार आहे. कारण जिल्हा बँक ही या जिल्ह्यातील लाखो गोरगरीब शेतकऱ्यांची आधार आहे. ती काय कुणाची खासगी मालमत्ता नव्हे. आज तिचा वापर आपण स्वतःची मालमत्ता असल्यासारखी करत आहात, त्याविरुद्ध मी बोलणार आणि अजून बोलणार आहे असा इशारा व्ही.बी. यांनी दिला.
गद्धारी गाडणे यालाच प्राधान्य
कोल्हापूर उत्तर विधानसभा बाबतीत नेत्यांनी आदेश दिल्यास व आघाडीने जबाबदारी टाकल्यास लढण्यास तयार आहे. मी गेले 20 वर्षे सामाजिक कामातून हजारो लोकांची ऋणानुबंध जपले आहेत. त्याची पोचपावती कोल्हापूरची जनता मला निश्चितच देईन. परंतु ते मला फार महत्त्वाचं नसून भ्रष्टाचार आणि गद्दारी गाडण्यासाठी हे महत्त्वाचं आहे म्हणून कागलची तळागाळातील जनता त्यांचा हिशोब चुकता करणार याचा मला आत्मविश्वास आहे असेही पाटील यांनी म्हटले आहे.