जिल्हाध्यक्षपदी पी. एन. पाटीलच
By Admin | Published: March 25, 2016 09:30 PM2016-03-25T21:30:14+5:302016-03-25T23:44:14+5:30
काँग्रेसमध्ये चढाओढ : काही दिवस संधी मिळण्याची शक्यता
आयुब मुल्ला --खोची जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू असल्या तरी त्यास लवकर मूर्त स्वरूप येणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कालावधी संपण्या इतपत त्यास वेळ लागेल. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष पी. एन. पाटील हेच या पदावर आणखी काही महिने राहतील; परंतु या पाठीमागे माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे या गटाचा खरा संघर्ष कारणीभूत आहे.सलग दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष पदाला वाढीव मुदत मिळवून विराजमान झालेले राज्यातील पी. एन. पाटील हे एकमेव जिल्हाध्यक्ष आहेत. मध्यंतरी प्रकाश आवाडे यांनी जोरदार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. तत्कालीन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी ए. के. अँटोनी यांची तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख व जयवंतराव आवळे यांनी दिल्लीत भेट घेऊन पाटील यांच्या होणाऱ्या बदलीस स्थगिती मिळविली होती. त्यानंतरही प्रयत्न झाले; परंतु पाटीलच अध्यक्षपदी कायम राहिले.विधान परिषद निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी मागितली. अखेर अध्यक्षपदाचा शब्द मिळाल्याने त्यांनी माघार घेतली, असे बोलले जाते; परंतु तरीसुद्धा त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन नेत्यांचा त्यांच्या निवडीला थेट विरोध आहे. यामध्ये प्रामुख्याने जयवंतराव आवळे, पी. एन. पाटील यांचा समावेश आहे. हे दोघे जवळचे मित्र आहेत, तर या दोघांचा प्रखर राजकीय तोही पक्षाअंतर्गत विरोधक हे प्रकाश आवाडे आहेत. हीच अडचण आवाडे यांना प्रत्येक वेळी अध्यक्षपदाला अडचणीची ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष बदलाबाबत प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. यावेळी आवाडे यांनी हक्काने मीच अध्यक्षपदाचा दावेदार असल्याची भूमिका मांडली; परंतु तिथे उपस्थित असणाऱ्या काही जणांनी किमान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होईपर्यंत तरी अध्यक्षपद बदलू नका, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी पुन्हा पी. एन. पाटील हेच राहतील, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
काँग्रेसमध्ये एकोपा निर्माण व्हावा
हातकणंगले तालुक्यातील जयवंतराव आवळे व प्रकाश आवाडे यांचे राजकीय वैर अजून घट्ट आहे, असे दिसते; परंतु ते मिटावे, एकत्र यावेत व काँग्रेसमध्ये एकोपा निर्माण व्हावा, त्यामुळे पक्ष भक्कम होईल. अन्यथा वैर कायमच राहिले तर याचा फायदा विरोधी पक्षांना आपोआपच होत राहील. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे पर्यायाने काँग्रेसचेच नुकसान होईल, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.