जिल्हाध्यक्षपदाने आवाडेंना विधानसभेला उभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:50 AM2019-01-28T00:50:02+5:302019-01-28T00:50:07+5:30
अतुल आंबी । लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदी झालेली निवड ही ...
अतुल आंबी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदी झालेली निवड ही आवाडे कुटुंबीयांसह गटाला उभारी देणारी ठरली आहे. या निवडीमुळे नवे-जुने सर्व कार्यकर्ते व प्रमुख नेते ‘रिचार्ज’ झाले असून, त्यांच्यात उत्साह पाहावयास मिळत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर मिळालेल्या या पदामुळे आवाडे गटाची पक्षावरील नाराजीही दूर झाली आहे.
जिल्ह्यातील कॉँग्रेसमध्ये माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे मोलाचे योगदान आहे. कॉँग्रेस पक्षाला जनमानसांत रूजविण्यापासून पक्षाशी एकनिष्ठपणाने राहत दोन्ही पिढ्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले आहे. सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांना अपयश आले. त्यापाठोपाठ जिल्हाध्यक्ष निवडणुकीत कल्लाप्पाण्णा आवाडे यांना अपयश आले. सर्वच निवडणुकांमध्ये लागोपाठ अपयश आल्याने आवाडेंची पीछेहाट झाली. त्यामुळे आवाडेंसह गटाची मोठी हानी झाली. या परिस्थितीत अतिशय संयमाने हालचाली करत ँप्रकाश आवाडे यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. अंतर्गत गटबाजीचा फटका आवाडे यांना बसत होता. त्यामुळे सन २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी आवाडेंनी राहुल आवाडे यांना आपल्या पूर्वाश्रमीच्या मतदारसंघातून उमेदवारी मागितली. ठरल्यासारखे पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामुळे आवाडे यांनी ताराराणी पक्षाची स्थापना करून पक्षाला ताकद दाखविण्याच्या हेतूने बंड करून स्वबळावर निवडणूक लढवली आणि त्यात विजयही मिळविला. संपूर्ण जुना आवाडे गट सक्रिय करून मिळविलेले हे यश आवाडेंच्या पथ्यावर पडले.
पुन्हा राजकीय समीकरणे बदलत गेली. आवाडेंनी आता आपली वाटचाल गतिमान केली. प्रमुख संस्था असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बॅँक, जवाहर साखर कारखाना याठिकाणी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. त्यातून नॅशनल शुगर फेडरेशन नवी दिल्लीचे संचालक पद व राज्य साखर संघाच्या संचालकपदी रूजू झाले. विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून जनतेशी व कार्यकर्त्यांशी जोडून राहणे. जुन्या चुका भरून काढणे, यावर भर देण्याचे काम प्रकाश आवाडे यांनी सुरू केले. जिल्हा परिषदेतील सत्तेत सहभाग घेतला.
जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे अपरिहार्य बनले. त्यासाठी मनोमिलन व्हावे म्हणून वरिष्ठ स्तरावरूनही हालचाली झाल्या. त्याचीच संधी साधत जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होऊन आवाडे यांनी वरिष्ठांना आपल्या कौशल्याची खात्री पटवून दिल्याने त्यातून जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली.
सन २०१२ मध्ये हुकले होते पद
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी २०१२ मध्ये माजी आमदार संजय घाटगे यांच्याविरोधात जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक लढवली. त्यात घाटगे विजयी झाले. मात्र, निवडणुकीनंतर आवाडे समर्थकांना मारहाण करण्यात आली. जिल्हा कॉँग्रेसच्या राजकारणात घडलेल्या या प्रसंगाची राज्यस्तरावरील नेत्यांनी गंभीर दखल घेत घाटगे यांच्या निवडीला स्थगिती दिली आणि सन २०१४ मध्ये अध्यक्षपदाची माळ पी. एन. पाटील यांच्या गळ्यात पडली होती.
निवडीचा होणार फायदाच
या निवडीमुळे प्रकाश आवाडेंना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा होणार आहे. अंतर्गत गटबाजी संपुष्टात आल्यामुळे आवाडे-आवळे, आवाडे-पी.एन. पाटील असे मनोमिलन झाले आहे. या मनोमिलनामुळे सर्व गटांची ताकद एकवटली जाऊन त्याचा फायदा निवडणुकीत होणार आहे.