लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यास अटक

By उद्धव गोडसे | Published: October 3, 2023 06:25 PM2023-10-03T18:25:04+5:302023-10-03T18:48:09+5:30

कोल्हापूर : ठेकेदाराने क्रीडा कार्यालयास पुरविलेल्या साहित्याचे आठ लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी १५ टक्के दराने एक लाख १० हजार ...

District Sports Officer of Kolhapur arrested while accepting a bribe case | लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यास अटक

लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यास अटक

googlenewsNext

कोल्हापूर : ठेकेदाराने क्रीडा कार्यालयास पुरविलेल्या साहित्याचे आठ लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी १५ टक्के दराने एक लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारणारा जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर विश्वनाथ साखरे (वय ५२, रा. राजगुरू हाउसिंग सोसायटी, विश्रामबाग, सांगली) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. मंगळवारी (दि. ३) दुपारी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा कार्यालयातच ही कारवाई झाली. या कारवाईमुळे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा लाचखोर कारभार चव्हाट्यावर आला. साखरे यांची क्रीडा उपसंचालक म्हणून पदोन्नती होणार होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील ठेकेदाराने कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास ॲल्युमिनियम प्रिंटिंग प्लेट पुरवण्याचे ई-टेंडर घेतले होते. दोन महिन्यांपूर्वी काम पूर्ण करून त्यांनी आठ लाख ८९ हजार २०० रुपयांची बिले सादर केली. मात्र, जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे यांनी बिल मंजूर करण्यास टाळाटाळ केली. चार दिवसांपूर्वी ठेकेदाराने भेटून विचारणा केली असता, त्यांनी बिल मंजूर करण्यासाठी एकूण बिलाच्या १५ टक्के म्हणजे एक लाख २७ हजार ९५० रुपये लाचेची मागणी केली. याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.

तक्रारीची खातरजमा केल्यानंतर मंगळवारी जिल्हा क्रीडा कार्यालयात सापळा रचून, साखरे याला एक लाख १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. साखरे याच्या सांगलीतील घराची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उपअधीक्षक नाळे यांच्यासह निरीक्षक बापू साळुंके, संजीव बंबरगेकर, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, मयूर देसाई, संदीप पवार आदींनी ही कारवाई केली.

साखरेची वादग्रस्त कारकिर्द

लाचखोर साखरे २०१८ पासून कोल्हापुरात आहे. ते उत्तम योग शिक्षक आहेत. योग व क्रीडा शिक्षणात त्यांनी पीएच.डी. केली आहे. कार्यालयातही त्यांचा दबदबा होता. त्याच्या कार्यशैलीवर अनेक खेळाडू आणि क्रीडा संघटना नाराज होत्या, अशी चर्चा आहे.

जळगावची बदली रोखली

कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर चार महिन्यांपूर्वीच साखरे याची जळगावला बदली झाली. मात्र, त्याने एका ‘अमित’ला काही लाख रुपये देऊन बदली टाळल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात आहे. लाच घेताना त्याला अटक झाल्याचे समजताच काही क्रीडा संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला.

चंदगडला तीन टक्के, कोल्हापुरात १५ टक्के

चंदगडला जल जीवन मिशनच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी उपअभियंता महिलेने तीन टक्के दराने ३३ हजारांची मागणी केली होती. साखरे यांनी चक्क १५ टक्के दराने लाचेची मागणी केली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी दोन महिन्यांपूर्वी लाचेचे असेच दरपत्रक जाहीर केले होते व त्याबद्दल सरकारकडे बोट दाखविले होते.

आठ महिन्यांत १७ कारवाया

उपअधीक्षक नाळे यांनी जानेवारी २०२३ पासून १७ कारवाया केल्या. यात वर्ग १ च्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली. तक्रारदारांनी आवश्यक पुराव्यांसह लाचखोरांच्या विरोधात तक्रारी द्याव्यात, असे आवाहन नाळे यांनी केले आहे.

Web Title: District Sports Officer of Kolhapur arrested while accepting a bribe case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.