डमी ग्राहक बनून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची साठेबाजांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 11:59 AM2020-05-04T11:59:49+5:302020-05-04T12:01:36+5:30
कोल्हापूर : युरिया गोडावूनमध्ये असतानाही तो संपला आहे, असे उत्तर चक्क जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनाच ऐकावे लागले. डमी ग्राहक ...
कोल्हापूर : युरिया गोडावूनमध्ये असतानाही तो संपला आहे, असे उत्तर चक्क जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनाच ऐकावे लागले. डमी ग्राहक बनून गेलेल्या अधिकाºयांना वस्तूस्थिती कळाल्यावर लागलीच धाडी टाकण्याची कारवाई करावी लागली. साठेबाजी आणि वाढीव दराने विक्री केल्याचा गुन्हा नोंदवून चार खत खरेदी विक्री संघांना जाग्यावरच कारवाईची नोटीस काढण्यात आली. उद्या मंगळवारी सुनावणी झाल्यानंतर परवाना निलंबनाची कारवाई होणार आहे.
जिल्ह्यात कृषी विभागाने रासायनिक खते उपलब्ध करून दिली आहे, कुठेही टंचाई भासणार नाही, असे नियोजन केले आहे, तथापि लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याचे कारण देत खत विक्री संघ व कृषी सेवा केंद्राकडून शेतक-यांची अडवणूक होत आहे. तक्रारी वाढल्याने स्वत: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी तिघांचे पथक स्थापन करून स्वत:च जिल्हाभर फिरण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांच्यासोबत मोहीम अधिकारी एस. आर. देशमुख, गुणनियंत्रण कक्ष अधिकारी रामचंद्र शेळके हे देखील सहभागी झाले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून हे दौरे करीत आहेत. अचानक एखाद्या खतांच्या दुकानात जात आहेत, तेथे ओळख लपवून खतांची मागणी करीत आहेत.
सरवडे व मुदाळतिट्टा येथे युरियाची मागणी केली असता युरिया संपला असल्याचे त्यांना सांगण्यात आले, त्यानंतर त्यांनी १0:२६:२६ हे खत मागितले, त्याची पावती देण्यास सांगितले, पण ते वाढीव दराने दिल्याने त्यांनी रेकॉर्ड तपासले, गोडावूनची पाहणी केली असता, तब्बल १२८ पोती युरियाची सापडली. गोडावून सील करून त्या खरेदी विक्री संघाच्या दुकानदारांवर तिथेच कारवाई केली. रविवारी बिद्री, बोरवडे, सरवडे, उंदरवाडी, मुदाळतिट्टा तर शनिवारी तळसंदे, नवे पारगाव, कोडोली, शहापूर, केर्ली या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. पूर्णपणे ओळख लपवून ही तपासणी होत असल्याने दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.
दोन दिवसांत १६ दुकाने तपासली, चार दुकानदारांच्या व्यवहारात गडबड आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे. तालुका पथकाकडून आणखी चार प्रस्ताव आले आहेत. या सर्वांची मंगळवारी सुनावणी होऊन त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू होणार आहे.
ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी