कोल्हापूर जिल्ह्यात वळवाने उडविली दैना झाडे पडली, विद्युत तारा तुटल्या : घरावरील पत्रे उडाले,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:14 AM2018-05-11T01:14:27+5:302018-05-11T01:14:27+5:30
कोल्हापूर : वाढत्या उष्म्याने अनेक दिवस घामाच्या धारा वाहिल्यानंतर गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात झालेल्या वळवाच्या पावसाने गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र,
कोल्हापूर : वाढत्या उष्म्याने अनेक दिवस घामाच्या धारा वाहिल्यानंतर गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात झालेल्या वळवाच्या पावसाने गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, जोरदार वादळी वारे, गारांचा मारा यामुळे अनेक गावांत नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे पडली, विद्युत तारा तुटल्या, खांब वाकले, घरावरील, गोठ्यावरील, कारखान्यांवरील पत्रे उडाले, कौले फुटली. वळवाचा हा पाऊस खरिपाच्या मशागतीसाठी आवश्यक असून उसालाही पूरक ठरणारा आहे.
पुष्पनगरमध्ये घराचे पत्रे उडाले
गारगोटी : भुदरगड तालुक्यामध्ये सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाने हजेरी लावली. वाºयाने पुष्पनगर येथील शिवाजी मारुती डांगे यांच्या घरावरील पत्रे उडून तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
हातकणंगले तालुक्यात झाडे उन्मळली, विद्युत तारा तुटल्या
हातकणंगले : हातकणंगलेसह आळते, मजले, तारदाळ, रुकडी, माणगाव, हेरले, अतिग्रे, चोकाक परिसरात सायंकाळी धुळीच्या वादळासह जोरदार पाऊस झाला. वाºयामुळे वडगाव-हातकणंगले आणि अतिग्रे- इचलकरंजी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्यामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली. अनेक गावांतील घरांचे, जनावरांच्या गोठ्यांचे, औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे पत्रे उडाल्यामुळे नुकसान झाले आहे. विजेअभावी अनेक गावे अंधारात गेली.
राधानगरी तालुक्यात गारांचा वर्षाव, पत्रे उडाले
राधानगरी / कसबा तारळे : गारांचा वर्षाव, मेघगर्जना, वादळी वाºयासह झालेल्या वळवाच्या पावसाने राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागाला जोरदार तडाखा दिला. घरावरील सिमेंटचे पत्रे, कौले उडून जाण्याबरोबरच वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक खंडित झाली आहे.
दगडी शिप्पूरमध्ये छप्पर उडाले
गडहिंग्लज : शिप्पूर तर्फ आजरा (ता. गडहिंग्लज) येथील पांडुरंग काशिनाथ पाटील यांचे शिप्पूर-करंबळी मार्गावरील शेतवडीतील घराचे छप्पर वादळी वाºयामुळे उचकटून बाजूला फेकले गेले. घरातील धान्य भिजले असून, छप्पराचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांनी शासनाच्या घरकुल योजनेतील अर्थसहाय्यातून हे घर बांधले आहे. घराशेजारील विजेचा खांबदेखील खाली कोसळला आहे.
उत्तूर परिसरात जोरदार
उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) परिसरात सायंकाळी साडेचारच्या सुमारास वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या आवाजासह गारांचा खच पडला.
शिरोळ तालुक्यात वादळी वाºयामुळे नुकसान
जयसिंगपूर / कुरुंदवाड / उदगांव : वादळी वाºयासह शिरोळ तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली तर वीजपुरवठाही खंडित झाला. कुरुंदवाड येथे एस. के. पाटील महाविद्यालयावरील पत्रे उडाले. नृसिंहवाडी-कुरुंदवाड मार्गावरील झाडे उन्मळून पडली. नांदणी येथे शेडचे पत्रे उडाले. बुबनाळ-औरवाड दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले. त्यामुळे काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती. तर आलास येथे रियाज पाशा पाटील यांचे पत्र्याचे शेड उडून मुराशे यांच्या घरावर पडले.
उदगांव, अंकली, कोथळी, चिंचवाड परिसरात वीट भट्ट्यांचे मोठे नुकसान झाले. तर उदगाव येथे यात्रेसाठी आलेल्या दुकानदारांना पावसाचा फटका बसला.
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुवारी दुपारी वादळी वाºयासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळ जोराचे सुटल्याने झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले. येथील श्री दत्त मंदिर परिसरात घातलेले कापडी मांडव जमीनदोस्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर परिसराला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारे, जोरदार पावसाने शहर व परिसरास झोडपून काढले. वाºयामुळे शहर व ग्रामीण परिसरात असंख्य झाडे उन्मळून पडली. विद्युत खांबांवर व वाहिन्यांवर फांद्या तुटून पडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील विविध ठिकाणी घरे, कारखान्यांवरील पत्रे उडाले. झाडे पडल्यान वाहनांचे नुकसान झाले.
शहरामध्ये स्टेशन रोड, सांगली रोड, हवामहल बंगला रस्ता, झेंडा चौक, जुना सांगली नाका, व्यंकोबा मैदान-नाट्यगृह परिसर, साखरपे हॉस्पिटल परिसर, प्रियदर्शनी कॉलनी, गणेशनगर, थोरात चौक, लिंबू चौक, व्यंकटराव हायस्कूल परिसर, कलानगर, कोल्हापूर रोड, आदी परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे व झाडांच्या फांद्या पडल्या. गणेशनगर-शहापूर येथे घर व यंत्रमाग कारखान्याच्या शेडवरील पत्रे उडून गेले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात निलगिरीचे झाड पडल्यामुळे सुमारे तासभर बसेस वाहतूक बंद होती. आसरानगरमध्ये लग्नाचा एक मंडप वादळी वाºयाने उडून गेला.
शहरातील सर्वच प्रमुख रस्ते ‘ब्लॉक’
शहरातून बाहेर जाणाºया सर्वच प्रमुख रस्त्यांवर झाडे किंवा झाडांच्या फांद्या, तसेच विद्युत वाहिन्या तुटून पडल्यामुळे सुमारे दोन ते तीन तास शहरातील वाहतूकच विस्कळीत झाली होती. महावितरणच्या विविध पथकांनी प्रमुख रस्त्यांवर पडलेली झाडे व विद्युत वाहिन्या नागरिकांच्या मदतीने दूर केल्या. शहापूर एस.टी. आगाराजवळ विद्युत रोहित्र खांबासह जमीनदोस्त झाले.
कबनूरमध्ये वादळी वारे
सुसाट वादळी वारे व पाऊस यामुळे कबनूरमध्ये अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. गंगानगर रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. दत्तनगर येथील गोपीनाथ सुतार यांच्या घराजवळ विद्युत खांब पडल्याने वायरी तुटल्या. भुजंग सुतार यांच्या घरावरील पत्रे उडाले. फरांडे मळ्यातील पाटील यांच्या घरावरील व दत्तनगर गल्ली नं. १० मधील देवदास धामणे यांच्या घरावरील व कारखान्यावरील पूर्ण पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले.
यड्राव, अब्दुललाटमध्ये भिंत कोसळून तिघे जखमी
यड्राव परिसरात जोरदार वारा व पावसामुळे झाडे उन्मळून पडली. विद्युत खांब पडले, घरावरील पत्रे व खोकी, खाद्यपदार्थांच्या गाड्या उलटल्याने नुकसान झाले. ग्रामस्थांनी झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अल्फोन्सा स्कूलची स्वागत कमान कोसळून नुकसान झाले. खंडोबावाडी येथे पावसातच विद्युत खांब रस्त्यावर पडल्यनंतर आसºयासाठी उभारलेल्या दोघांच्या अंगावर भिंत पडल्याने ते जखमी झाले.
अब्दुललाट येथे भिंत कोसळल्यामुळे रेखा कोळी या किरकोळ जखमी झाल्या आहेत, तर शिरदवाड-इचलकरंजी मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम सुरू होते.