जिल्हा परिषदेत विभागनिहाय ‘बायोमेट्रिक’
By admin | Published: December 25, 2014 11:38 PM2014-12-25T23:38:43+5:302014-12-26T00:05:20+5:30
लेटकमर्सना चाप : नियंत्रण ठेवणे झाले सोपे, १२ विभागांसाठी प्रक्रिया सुरू
कोल्हापूर : जिल्हा परिषदेने सर्व १२ विभागांत स्वतंत्र बायोमेट्रिक यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला आहे. उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी लेटकमर्सना महिन्यापूर्वी दणका दिला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेळेवर कटाक्षाने नजर ठेवली आहे. आता विभागांत बोयोमेट्रिक यंत्र बसवून लेटकमर्सना चाप बसविणार आहे.
महिन्यापूर्वी उपाध्यक्ष खोत यांनी सकाळी दहा वाजता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबून लेटकमर्सना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर लेटकमर्सचा मुद्दा ऐरणीवर आला. सामान्य प्रशासनही लेटकमर्सना चाप लावण्यासंबंधी गांभीर्याने विचार करू लागले. यातूनच स्थायी समितीच्या सभेत नुकतेच प्रत्येक विभागाला स्वतंत्र बायोमेट्रिक यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने कार्यालयात तळमजल्यावर दोन आणि प्रत्येक मजल्यावर एक, अशी पाच बायोमेट्रिक यंत्रे बसवली. यंत्रांवर सामान्य प्रशासन नियंत्रण ठेवते. कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आणि यंत्रे कमी असल्यामुळे नियंत्रण ठेवताना मर्यादा येत होत्या. त्यामुळे विभागप्रमुख ‘मॅन्युअल’ हजेरी पद्धत ठेवतात. त्यामुळे विभागप्रमुखाच्या मर्जीतला कर्मचारी उशिरा आला तरी ‘उशिरा शेरा’ पडत नव्हता. याचा परिणाम म्हणून विभागप्रमुखाला मॅनेज केले की, कार्यालयात कधीही आले तरी चालते, अशी मानसिकता वाढू लागली. तसेच बढती, बदलीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांची नावे बायोमेट्रिक यंत्रातून वेळच्यावेळी कमी होत नव्हती. तर सर्व विभागांत एकूण कर्मचारी किती, याबद्दल नेमकेपणा नव्हता.
यासाठी सामान्य प्रशासन, बांधकाम, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, अर्थ, आरोग्य, पशुसंवर्धन, शेती, अशा १२ विभागांत बायोमेट्रिक यंत्रे बसवणार आहेत. यामुळे कोणता कर्मचारी ‘थंब’करतो, कोण करीत नाही, हे निदर्शनास येणार आहे. बढती, बदली होऊन गेलेल्या कर्मचाऱ्यांची नावे त्या-त्यावेळी कमी करता येणार आहेत.
दहा महिला कर्मचाऱ्यांसाठी 'मॅन्युअल हजेरी'
बायोमेट्रिक पध्दतीमुळे जिल्हा परिषदेत एकूण ५५३ कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दहा महिला कर्मचाऱ्यांच्या दोन्ही हातांच्या बोटांच्या रेषा अस्पष्ट आहेत. त्यामुळे बायोमेट्रिक यंत्रावर त्यांची हजेरी नोंदविली जात नाही. त्यामुळे त्या महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘मॅन्युअल’ हजेरी ठेवावी लागणार आहे.
प्रत्येक विभागाला बायोमेट्रिक बसविल्यामुळे लेटकमर्सना चाप बसणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत सर्व विभागांत स्वतंत्र यंत्रे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक निधी घ्या, अशी सूचनाही केली आहे.
- शशिकांत खोत, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद