दिव्यांग थांगराजा यांची दुचाकीवरून भारत परिक्रमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 04:55 PM2019-09-18T16:55:05+5:302019-09-18T16:57:46+5:30
स्वामी विवेकानंद यांचा विचार आणि संदेश देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील आर. थांगराजा या दिव्यांग व्यक्तीने दुचाकीवरून ‘भारत परिक्रमा’ सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून १६०० किलोमीटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात आलेल्या आर. थांगराजा यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : स्वामी विवेकानंद यांचा विचार आणि संदेश देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील आर. थांगराजा या दिव्यांग व्यक्तीने दुचाकीवरून ‘भारत परिक्रमा’ सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून १६०० किलोमीटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात आलेल्या आर. थांगराजा यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकाच्या सप्टेंबर २०१९ ते २०२० या काळात साजऱ्या होणाऱ्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आर. थांगराजा यांनी ‘विश्वबंधुत्व दिवसा’च्या औचित्याने ११ सप्टेंबर रोजी या परिक्रमेस कन्याकुमारी येथून प्रारंभ केला. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून थांगराजा यांनी खास तयार केलेल्या स्कूटरवरून कन्याकुमारीहून लेह, इटानगर आणि कन्याकुमारी अशा मार्गाने त्यांची परिक्रमा सुरू केली आहे.
गोव्याहून मंगळवारी (दि. १७) रात्री कोल्हापुरात आलेल्या थांगराजा यांनी बुधवारी पुण्याकडे प्रयाण केले. तेथून ते मुंबईकडे जाणार आहेत. कोल्हापुरात ‘प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड’चे अंध कार्यकर्ते सतीश नवले, कोल्हापूर केंद्राचे संचालक अरुण जनार्दन कुलकर्णी, ज्ञानसंवर्धन प्रकाशनचे ज्ञानराज भेलोंडे यांनी त्यांचे स्वागत केले.
कन्याकुमारी येथील इझुस्सातूपट्टू येथे २१ जून १९८१ रोजी जन्मलेल्या थांगराजा यांनी इलेक्ट्रॉनिक्स अॅँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले असून २००८ पासून ते कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात कार्यरत आहेत. या शिलास्मारकाच्या उभारणीमध्येही त्यांनी त्यांच्या आईसह योगदान दिले आहे. पोलिओमुळे लहानपणापासून त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
यापूर्वी केलेल्या परिक्रमा
१. कन्याकुमारी ते चेन्नई द्वारा रामेश्वरम, पुडुचेरी (१९ दिवसांत ११०० किलोमीटर, १९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१३)
२. कोलकाता ते कन्याकुमारी, द्वारा ओरिसा-आंध्र प्रदेश (५२ दिवसांत २८०० किलोमीटर, २२ जुलै ते ११ सप्टेंबर २०१३)
३. टिमटाला (अमरावती) ते कन्याकुमारी, द्वारा हैदराबाद, बंगलोर (१३ दिवसांत २८०० किलोमीटर, ७ ते १९ नोव्हेंबर २०१४)
४. भगिनी निवेदिता जन्मशताब्दी वर्षानिमित्त कन्याकुमारी ते दार्जिलिंग, द्वारा नागपूर, कोलकाता (२३ दिवसांत ४५०० किलोमीटर, २३ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर २०१७)