दिव्यांगाचा जिल्हा परिषदेच्या टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 05:39 PM2020-02-07T17:39:06+5:302020-02-07T17:43:31+5:30
दिव्यांगांनी पोलीस आणि प्रशासनाची नजर चुकवून थेट जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने शुक्रवारी मुख्यालयात एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली.
कोल्हापूर : दिव्यांगांनी पोलीस आणि प्रशासनाची नजर चुकवून थेट जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने शुक्रवारी मुख्यालयात एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली.
पोलिसांनी क्षणार्धात लिफ्टमधून टेरेसवर धाव घेत आंदोलनकर्त्या पाच दिव्यांगांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर तातडीने प्रभारी सीईओ अजयकुमार माने यांनी बैठक घेऊन मागण्या समजून घेत अडवणूक करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईचे आदेश काढले.
प्रहार अपंग क्रांती संघटनेने शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चाचे नियोजन केले होते. मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा निषेध म्हणून आत्मदहनाचा इशारा दिला असल्याने जिल्हा परिषदेत फायर ब्रिगेडच्या गाडीसह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तीनही गेटना कुलूप लावण्यात आली होती. देवदत्त माने यांच्या नेतृत्वाखाली दुपारी साडेबाराच्या सुमारास दिव्यांगांची मोटारसायकल रॅली दसरा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय करत मुख्यालयासमोर आली. तेथे जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच आणि मोठा पोलीस बंदोबस्त असतानाच अक्षय म्हेत्तर, गोरखनाथ कांबळे, कृष्णात कवडे, अभिषेक पाटील, बाबासाहेब जाधव हे नजर चुकवून मुख्यालयात घुसले.
तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून निषेधाच्या घोषणा ऐकू येऊ लागल्यानंतर सर्वांचे लक्ष तिकडे गेले. पोलिसांनी वेळीच धाव घेत पाचही दिव्यांगांना ताब्यात घेतले.
या घटनेनंतर प्रभारी सीईओ अजयकुमार माने यांनी तातडीने कार्यालयात आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला बोलावले. समाजकल्याण मंत्री दीपक घाटे, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनाही बैठकीला बोलावले.