दिव्यांगांचे ‘कपडे काढो’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:37 AM2017-10-16T00:37:57+5:302017-10-16T00:38:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दिव्यांग बांधवांच्या मागण्या अद्याप शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्याच्या निषेधार्थ आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवार (दि. १३) पासून अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलन’तर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांतर्फे अन्नत्याग आंदोलन सुरू असून, रविवारी तिसºया दिवशी दिव्यांगांकडून कपडे काढून शासनाचा निषेध करण्यात आला.
आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग, अनाथ, शेतकरी व विधवांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाविरोधात शुक्रवार (दि. १३) पासून अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधिस्थळ येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर दिव्यांग बांधवांनीही आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाच्या तिसºया दिवशी रविवारी आंदोलकांनी कपडे काढून शासनाचा निषेध केला. रविवारी तिसºया दिवशी खासदार धनंजय महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दिव्यांग बांधवांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनात देवदत्त माने, तुकाराम पाटील, संदीप दळवी, जोतिबा गोरल, अक्षय म्हेतर, वैजयनाथ केसरकर, आशितोष डोंगरे, विनायक लोहार, दीपक पाटील, रामचंद्र वडेर, संजय जाधव, आदी उपस्थित होते.
सहाजणांची प्रकृती बिघडली
आंदोलनाच्या रविवारी तिसºया दिवशी प्रहार दिव्यांग संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. चेतन मुरलीधर पोतदार (वय २२), गणेश सुधाकर कोळेकर (२८, दोघे रा. तळंदगे, ता. हातकणंगले), शंकर भीमाप्पा गुरव (५६, रा. उचगाव, ता. करवीर), विकास चौगुले (३०, रा. पोर्ले, ता. पन्हाळा), मयूर जाधव (२६), संदीप चोरगे (२६, दोघे रा. कापशी) अशी त्यांची नावे आहेत.