Diwali : दीपोत्सव पर्वाला प्रारंभ, अभ्यंगस्नानाने सुरुवात, कोल्हापूर बाजारपेठेला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:00 PM2018-11-06T13:00:08+5:302018-11-06T13:06:48+5:30
धकाधकीचे जीवन, ताण-तणावातूनही वेळ काढत गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या सणाची जय्यत तयारी सुरू होती ती दिवाळी म्हणजेच दीपोत्सव पर्वाला आज, मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. शहर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे तर खरेदीसाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांनी कोल्हापूर फुलून गेले होते. रात्री उशिरापर्यंत जागून सणाच्या स्वागताची लगबग सुरू होती.
कोल्हापूर : धकाधकीचे जीवन, ताण-तणावातूनही वेळ काढत गेल्या पंधरा दिवसांपासून ज्या सणाची जय्यत तयारी सुरू होती ती दिवाळी म्हणजेच दीपोत्सव पर्वाला आज, मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. शहर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे तर खरेदीसाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांनी कोल्हापूर फुलून गेले होते. रात्री उशिरापर्यंत जागून सणाच्या स्वागताची लगबग सुरू होती.
दिवाळी म्हणजे आकाशकंदिलाचा झगमगाट, पणत्यांचे तेज, चटपटीत फराळ, फटाक्यांची आतषबाजी, गोधन पूजन, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा या सहा दिवसांच्या उत्सवाला प्रारंभ झाला. वसू बारस हा दिवस शेतकरी बांधवांकडून तर धनत्रयोदशी हा दिवस विशेषत: वैद्यकीय क्षेत्राकडून साजरा केला जातो. त्यामुळे खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते ती नरकचर्तुदशीच्या अभ्यंगस्नानाने.
गेल्या वर्षभरापासून ज्या सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते, ठेवणीतल्या साड्या, पैठणीची घडी मोडते, अनेक अनुभवांनी सुरकुतलेल्या वृद्धांपासून ते निरागस लहान मुलांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यांवर हसू उमटते. आप्तेष्टांच्या भेटीने प्रेमळ आठवणींची उजळणी होत नातेसंबंधांची वीण अधिक घट्ट होते त्या दिवाळी पहाटेच्या तयारीची अपूर्वाई घरोघरी सुरू आहे.
धनत्रयोदशीच्या निमित्ताने सुरू झालेल्या या प्रकाशाच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी आता रांगोळी सजू लागली आहे. आकाशकंदीलाच्या प्रकाशाने घरदार उजळून निघालंय. लहानग्या हातांनी घडवलेल्या किल्ल्यांवर आता शिवाजी महाराज, मावळे, गावकऱ्यांचे आगमन झाले आहे समोर मिणमिणत्या प्रकाशात किल्ल्याला अधिक सौंदर्य आले.
विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा, शोभेचे आकाशकंदील, रंगरंगोटी, साफसफाईने घराचा कायापालटच झाला आहे. एक दिवसावर आलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी घरोघरी लगबग सुरू होती. बेसन-कळीचे लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा असा स्वादिष्ट फराळ बनविल्यानंतर महिलांनी घराची साफसफाई करून घर अधिकाधिक सुंदर बनविण्यासाठी, सुरेख सजावटी करून आपले कौशल्य पणाला लावले आहे.
पुरुष मंडळींनी आकाशकंदील, विद्युतमाळा लावत आपल्या दारात अधिकाधिक प्रकाश कसा पडेल, घराचे बाह्य रूप कसे खुलून दिसेल यावर लक्ष केंद्रित केले. बच्चेकंपनीचा उत्साह ओसंडून वाहत आहे तर ज्येष्ठांचा अनुभव सगळ्यांनाच कामी येत आहे. कुटुंबातल्या आबालवृद्धांचे हात आता कामात गुंतले आहेत.
आकाशकंदील...विद्युत रोषणाई
धनत्रयोदशीपासून दारात दिवे लावण्याची पद्धत आहे. त्यामुळे दारात लावलेल्या पणत्यांचा मंद प्रकाश दिवाळीचा आनंद घेऊन आला आहे. आकाशकंदील, विद्यत रोषणाई आणि पणत्यांच्या प्रकाशाने अवघे कोल्हापूर प्रकाशाच्या झगमगाटात न्हाऊन निघाले आहे.
बाजारपेठेला उधाण
वर्षातला सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीला भिशी, रिकरिंग, ठेव अशा बचतीतून मिळालेले पैसे खर्च केले जातात. ही बचत कुटुंबीयांसाठी खर्च करत कोल्हापूरकरांनी खरेदीचा आनंद लुटला. सणाला एक दिवस राहिलेला असताना शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महाद्वार रोड, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, ताराबाई रोड आणि लक्ष्मीपुरी येथे नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर ताण येऊन प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी होत होते.
उटणे, साबण, पूजा साहित्यांची खरेदी
नरकचर्तुदशीला उटणे आणि सुवासिक तेलाने अभ्यंगस्नान केले जाते. या अभ्यंगासाठी उटणे, तेल, साबणासह अत्तर, डिओ, सेंट अशा सुवासिक साहित्यांची खरेदी केली जात होती. तर बुधवारी लक्ष्मीपूजन असल्याने लक्ष्मी कुबेराचे फोटो, लाह्या, बत्तासे, झेंडूची फुले, पान, सुपारी, वस्त्रमाळ, धने, पाच फळे, केळी, धूप, कापूर, सुवासिक अगरबत्ती, अशा पूजेच्या साहित्यांची महापालिका चौक जोतिबा रोड, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट येथे खरेदी केली जात होती. झेंडू ३० रुपये पावकिलो, पाच फळे ४० रुपयांना तर धूप, अगरबत्तीची त्यांचा सुगंधावरून किंमत आकारली जात होती.