Diwali : कृष्णात आणि पूजा गहिवरले, सहाध्यायी विद्यार्थ्यांकडून मिळाली दिवाळीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 07:44 PM2018-11-02T19:44:58+5:302018-11-02T19:50:12+5:30
शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी फटाके न वाजवता वाचविलेल्या पैशातून कृष्णात आणि पूजा या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीसाठी शुक्रवारी नव्या कपड्यांची भेट दिली. दिवाळीला इतर विद्यार्थी नवे कपडे खरेदी करतात, हे ऐकून माहीत असलेल्या या दोघांना या भेटीने अक्षरश: गहिवरून आले.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी फटाके न वाजवता वाचविलेल्या पैशातून कृष्णात आणि पूजा या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीसाठी शुक्रवारी नव्या कपड्यांची भेट दिली. दिवाळीला इतर विद्यार्थी नवे कपडे खरेदी करतात, हे ऐकून माहीत असलेल्या या दोघांना या भेटीने अक्षरश: गहिवरून आले.
मोठ्या लोकांनी वर्गणी जमा करून एखाद्या गरजूला भेट देण्याची अनेक उदाहरणे ऐकली असतील; परंतु शाळकरी मुलांकडूनच आपल्याच शाळेत शिकणाऱ्या सहाध्यायी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना एखादी भेट देण्याचे उदाहरण विरळाच.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील अधिव्याख्याता नंदकुमार मोरे हे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे साक्षीदार होते.
शिवाजी मराठा हायस्कूलचे कलाशिक्षक मिलिंद यादव यांनी सहा वर्षांपूर्वी फटाके न वाजवता वाचलेल्या पैशातून एका सहाध्यायी विद्यार्थ्याला आर्थिक सहकार्य करता येईल, अशी संकल्पना मांडली. शाळेतील विद्यार्थ्यांनीही याला पाठिंबा दिला आणि दरवर्षी पहिल्या सत्राच्या समारोपाला विद्यार्थ्यांनीच निवडलेल्या एखाद्या गरजू विद्यार्थ्याला जमा केलेली मदत देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
खरेतर या शाळेतील बहुतेक विद्यार्थी हे झोपडपट्टीतील रहिवाशी. त्यांची आर्थिक स्थिती जेमतेमच. परंतु अशा परिस्थितीतही आपल्या सहाध्यायी विद्यार्थ्याला दिवाळीला मदत म्हणून कपडे तेही नवीन खरेदी करण्यासाठी जाण्याची त्यांची उर्मी म्हणजे त्यांच्या उच्च विचारांचे दर्शनच घडविते. प्रत्येक विद्यार्थ्याने जसे जमतील तसे थोडेफार पैसे जमा केले. फटाके न वाजविण्याची शपथ तर या विद्यार्थ्यांनी आधीच घेतलेली आहे. आता यातूनही त्यांनी सामाजिक भान जोपासले. या विद्यार्थ्यांचे नंदकुमार मोरे यांनी कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण काटकर व इतर सहकारी यांनीही मदत करून या विद्यार्थ्यांच्या एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेल्या या उपक्रमाला हातभार लावला आहे.
पौर्णिमाचे कौतुक
कोणाला कपडे आणावीत याची चर्चा शिक्षक मुलांबरोबर करत होते, तेव्हा शाळेतील गरजू असणाऱ्या पौर्णिमाचे नाव पुढे आले; परंतु स्वकष्टाचे १०० रुपये घेऊन तीच मदतीला पुढे धावली. पौर्णिमेच्या या मदतीमुळे शिक्षकांना स्वत:मधील खुजेपणा त्यांच्या मनाला धक्का देऊन गेला. खरेतर तिच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते; त्यामुळे यंदा तिच्या घरी दिवाळी होणार नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांनी पौर्णिमेलाच कपडे आणण्याचा विचार मांडला होता. असा विचार मांडणारे विद्यार्थीही झोपडपट्टीतील आहेत, यांना काय संस्कार असणार, असा विचार करणाऱ्यांना हा एक धक्काच म्हणावा लागेल.
एखाद्या कामाची सुरुवात जेव्हा आपण करतो आणि ते काम एका उंचीवर पोहोचते, तेव्हा मोठा मानसिक आनंद मिळतो. फटाके न वाजवता त्याच पैशातून आपल्याच एखाद्या गरजू सहाध्यायी विद्यार्थ्याला दिवाळीची कपडे आणावीत, या कल्पनेत आजही सातत्य राहिले आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. गलेलठ्ठ पगार असणारे लोक पौर्णिमेसारख्या विद्यार्थिनीसमोर खुपच छोटे वाटू लागतात.
मिलिंद यादव,
कलाशिक्षक, शिवाजी मराठा हायस्कूल