धुमकेतूच्या दर्शनाने साजरी झाली अवकाशातील दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 08:14 PM2020-11-15T20:14:11+5:302020-11-15T20:18:16+5:30

Astrology, diwali, kolhapurnews वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीची धूम, सर्वत्र आकाशकंदील आणि दिव्यांचा झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी आणि खरेदीचा उत्साह असतानाच पृथ्वीवासीयांच्या भेटीला आलेल्या एम-३ ॲटलास धुमकेतूमुळे शनिवारी अवकाशातही दिवाळी साजरी झाली. ताशी अंदाजे ५१ हजार ५०० किलोमीटर वेगाने प्रवास करणारा हा धुमकेतू पुन्हा १३९ वर्षांनी पृथ्वीजवळ येईल.

Diwali in space was celebrated with the appearance of a comet | धुमकेतूच्या दर्शनाने साजरी झाली अवकाशातील दिवाळी

दिवाळीदिवशी ॲटलास धूमकेतूचे दर्शन झाले.

Next
ठळक मुद्देधुमकेतूच्या दर्शनाने साजरी झाली अवकाशातील दिवाळी कुतूहलने अनुभवला दुर्मीळ योग : पुन्हा १३९ वर्षांनी भेटणार एम-३ ॲटलास

संदीप आडनाईक

कोल्हापूर : वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीची धूम, सर्वत्र आकाशकंदील आणि दिव्यांचा झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी आणि खरेदीचा उत्साह असतानाच पृथ्वीवासीयांच्या भेटीला आलेल्या एम-३ ॲटलास धुमकेतूमुळे शनिवारी अवकाशातही दिवाळी साजरी झाली. ताशी अंदाजे ५१ हजार ५०० किलोमीटर वेगाने प्रवास करणारा हा धुमकेतू पुन्हा १३९ वर्षांनी पृथ्वीजवळ येईल.

सी२०२० एम-३ ॲटलास हा धुमकेतू शनिवारी सूर्याभोवती परिभ्रमण करून पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे सव्वापाच कोटी किलोमीटर अंतराजवळ आला होता. मृग नक्षत्रामधील बेलॅट्रिक्स या ताऱ्याजवळ दिसणाऱ्या या धुमकेतूचा गाभा (कोअर) १ ते २ किलोमीटर असला तरी सूर्याजवळून प्रवास करताना उष्णतेने त्यावरील बर्फ, वायू यांचे प्रसरण होऊन जो वायूचा गोळा (कोमा) बनतो, तो अंदाजे ३,४०,००० किलोमीटर व्यासाचा आहे. पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराच्या जवळपास हे अंतर भरेल.
आयुष्यात एकदाच दर्शन देणाऱ्या या धुमकेतूचे निरीक्षण कोल्हापूरच्या कुतूहल फौंडेशनच्या हौशी खगोलप्रेमींच्या १५ जणांच्या चमूने शनिवारी रात्री अनुभवले. शहरातील प्रकाश व हवेचे प्रदूषण टाळून अमावास्येच्या काळोख्या रात्री गगनबावडा येथे त्यांनी हा दुर्मीळ योग साधला.

संस्थेचे सौरभ नानिवडेकर व सागर बकरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. डॉ. श्रीरंग देशिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत कामत, अर्जुन खेडेकर, चिन्मय जोशी, सार्थक नानिवडेकर, संघर्ष पाटील, वाणी देशपांडे, गौरी वासुदेवन, अमृता व सागर वासुदेवन, शिवेंद्र व शाम कागले, सम्मेद मादनाईक, अक्षय चव्हाण व आनंद आगळगावकर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

अवकाशातील २५ पेक्षा अधिक ताऱ्यांचे निरीक्षण

संस्थेकडील दहा इंची टेलिस्कोप व बायनॉक्युलरने या धुमकेतूबरोबरच मिल्की वे, देवयानी आकाशगंगा (अँड्रोमेडा गॅलॅक्सी), कृत्तिका, रोहिणी, मृगातील नेब्युला, क्रॅब नेब्युला, ट्रायनग्यूलम नेब्युला असे २५ पेक्षा अधिक अवकाशातील ताऱ्यांचे या चमूने निरीक्षण केले. सिंह राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाची सुरुवात आणि शर्मिष्ठेपासून मृगातील व्याध ताऱ्यापर्यंत पसरलेल्या आकाशगंगेतील अब्जावधी दीपज्योतींच्या कुतूहलाने जागविलेली ही दिवाळीची रात्र संस्मरणीय ठरली.
 

Web Title: Diwali in space was celebrated with the appearance of a comet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.