जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची 'दिवाळी'
By Admin | Published: November 16, 2015 12:25 AM2015-11-16T00:25:44+5:302015-11-16T00:28:44+5:30
दिवाळी सुटीचा हंगाम : अंबाबाई मंदिर, न्यू पॅलेस, पन्हाळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी
कोल्हापूर : दिवाळी, पाडवा, भाऊबीज या सणांनंतर लागून आलेल्या शनिवार, रविवार आणि सोमवारच्या औद्योगिक सुटीमुळे अंबाबाई देवीच्या दर्शनासह विविध पर्यटनस्थळे, वस्तुसंग्रहालये पाहण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळी पर्यटकांच्या अक्षरश: रांगा लागल्या आहेत. पर्यटकांच्या मांदियाळीमुळे कोल्हापुरातील गल्लीबोळ अक्षरश: जॅम झाले होते.
दिवाळीनिमित्त सलग चार दिवसांच्या शासकीय सुटीनंतर दुसरा शनिवार व रविवार आणि औद्योगिक सुटी तसेच मुलांच्या शाळांना सुट्या असल्यामुळे पर्यटनाचा हंगाम बहरला आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील पर्यटकांनी अक्षरश: रस्ते व गल्ल्या फुलून गेल्या होत्या. अंबाबाई मंदिराच्या परिसरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, साकोली, बिनखांबी गणेश मंदिर, बिंदू चौक, शिवाजी चौक, मिरजकर तिकटी, दसरा चौक अशा मंदिराच्या चोहोबाजूंनी पार्किंगसाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष पोलिसांची तैनात केली होती. त्यानुसार ठरवून दिलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्यासाठी हे कर्मचारी प्रयत्न करीत होते. वाढत्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या कर्मचारी वर्गासह देवस्थानच्या कायम सुरक्षारक्षकांसह खासगी सुरक्षा रक्षकांतील ४७ जण कार्यरत होते. रांगा लावून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी किमान दोन तास रांगेमध्ये थांबावे लागत होते; तर काही व्हीआयपी पर्यटक मधला मार्ग म्हणून शनिमंदिरापासून आतमध्ये ओळखीने अथवा एखाद्या बड्या अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रवेश करीत होते. पर्यटक अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनानंतर न्यू पॅलेस येथील वस्तुसंग्रहालय, शाहू जन्मस्थळ, जोतिबा, पन्हाळा किंवा खिद्रापूर लेणी, नृसिंहवाडी दत्तदर्शन, आदी ठिकाणी भेट देत आहेत. सुटीमुळे शहरातील पर्यटकही या स्थळांना भेटी देण्यासाठी जात असल्याने या सर्व ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत होती.
सलग सुट्यांमुळे बाहेरील पर्यटकांनी शहरातील हॉटेल्स, यात्री निवास, धर्मशाळा व खासगी ठिकाणचे हॉल, खासगी फ्लॅटही मोठ्या प्रमाणात आरक्षित केले आहेत. त्यामुळे शनिवार व रविवार आलेल्या पर्यटकांना राहण्यासाठी जागेची शोधाशोध करावी लागत होती. या सर्व धांदलीमध्ये रिक्षाचालकांकडून पर्यटकांना मध्यवर्ती बसस्थानक ते अंबाबाई मंदिर या मार्गावर माणसी भाडे ठरवून आणले जात होते. पर्यटकांनी रविवार असल्याने देवीच्या दर्शनानंतर कोल्हापुरी तांबडा-पांढरा रश्श्यावर ताव मारला. या हॉटेल्समध्ये दुपारी बारानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती; तर भवानी मंडप, बिंदू चौक, जोतिबा रोड, आदी ठिकाणी लहान मुलांच्या खेळण्यांचे स्टॉल उभे करण्यात आले होते. बिंदू चौक, ताराबाई रोड, मिस क्लार्क होस्टेल या ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली होती. ( प्रतिनिधी )
‘कोल्हापूर दर्शन’ बसची मागणी
राज्यासह परराज्यांतून येणाऱ्या पर्यटकांकडून, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी के.एम.टी. अथवा एस.टी. महामंडळाच्या वतीने पुणे, मुंबई, औरंगाबाद या शहरांसारखी दर्शन बस इथे मिळेल का, असे विचारणा केली जात होती. समोरच्याकडून उत्तर नाही म्हटल्यावर पर्यटकांचा भ्रमनिरास होत होता. ही मागणी रास्त असल्याने महापालिका परिवहन किंवा राज्य परिवहन महामंडळाने तिची दखल घेतली तर पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा काही विक्रे त्यांनी बोलून दाखविली.