पोलीस भरतीवेळी तरुणीला चक्कर
By Admin | Published: June 17, 2014 01:31 AM2014-06-17T01:31:41+5:302014-06-17T01:45:26+5:30
रिक्त २७३ पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरू
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलामध्ये रिक्त २७३ पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरू होत आहे. शारीरिक चाचणी परीक्षेदरम्यान आज, मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास अचानक एक तरुणी चक्कर येऊन पडल्याने पोलिसांनी तारांबळ उडाली. त्यांनी पोलीस जीपमधून तिला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले. मंजूषा आण्णाप्पा बरकाळे (वय १९, रा. मुरगूड) असे तिचे नाव आहे.
पोलीस शिपाई पदांसाठी शारीरिक पात्रता चाचणी सुरू आहे. त्यासाठी तीन किलोमीटर धावण्याची चाचणी घेतली जाते. ही चाचणी सुरू होती. १४ मिनिटांत ३ किलोमीटर अंतर पार केलेल्या मंजूषा बरकाळे हिला अचानक चक्कर आल्याने ती खाली पडली.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासह सहकाऱ्यांची धांदल उडाली. राज्यात सर्वत्र पोलीस भरती सुरू आहे. परवाच विक्रोळी मुंबई येथे भरती प्रक्रियेवेळी चार तरुणांचा मृत्यू झाल्याने कोल्हापूर पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली होती. (प्रतिनिधी)