‘डीकेटीई’च्या कापडाची जागतिक परिषदेकडून दखल
By admin | Published: May 28, 2014 01:00 AM2014-05-28T01:00:18+5:302014-05-28T01:00:27+5:30
पॉलिस्टर थ्रीडी कापड निर्मिती : दिल्लीत शोधप्रबंध सादर
इचलकरंजी : स्टील धातूला पर्यायी असलेले थ्रीडी कापड येथील डीकेटीई इन्स्टिट्यूटमधील श्री. ए. उदयन यांनी पॉलिस्टर धागा वापरून तयार केले. हे थ्रीडी कापड ‘स्टील’ऐवजी क्षेपणास्त्र, विमान, जहाज, आॅटोमोबाईल उद्योगांमध्ये वापरले जाते. अशा ‘पॉलिस्टर’च्या थ्रीडी कापडाची दखल नवी दिल्ली येथील जागतिक परिषदेमध्ये घेण्यात आल्याने ‘डीकेटीई’च्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या संशोधनाबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले म्हणाले, परंपरागतरीत्या वाचत असलेल्या स्टील धातूच्या उपलब्धतेबद्दल आता हळूहळू मर्यादा येत आहेत. स्टीलच्या वापरामुळे वजन वाढते. पर्यायाने इंधन व खर्चही वाढतो. त्याउलट थ्रीडी कापड स्वस्त आहे. वजनाने हलके आणि ताकदीने स्टीलपेक्षा दहापट जास्त आहे. म्हणून अलीकडे क्षेपणास्त्र, विमान बांधणी, जहाज, आॅटोमोबाईल यासारख्या विविध उद्योगांमध्ये थ्रीडी कापडांची मागणी अधिक आहे. डीकेटीई इन्स्टिट्यूटमध्ये मास्टर इन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेत असलेल्या श्री. ए. उदयन यांनी उच्च तंत्रज्ञानाच्या कापसाऐवजी २/१० या पॉलिस्टर धाग्याचा वापर करून थ्रीडी कापड तयार केले. त्यांनी हा शोधप्रबंध दिल्ली येथे भरलेल्या जागतिक स्तरावरील परिषदेमध्ये मांडला. परिषदेमध्ये इंग्लंड, अमेरिका, स्वीडन अशा विविध देशांतील २५० संशोधक सहभागी झाले होते. उदयन यांनी सादर केलेल्या प्रबंधाबद्दल परिषदेत कौतुक झाले, असेही प्राचार्य कडोले यांनी स्पष्ट केले. उदयन हे टेक्स्टाईल विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. यु. जे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत असून, त्यांच्या या संशोधनाबद्दल संस्थेचे संचालक सुनील पाटील यांनी उदयन यांचा सत्कार केला. (प्रतिनिधी)