बहुजन पुरोहितांची ज्ञानगंगा ‘शाहू वैदिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:34 AM2019-04-01T00:34:50+5:302019-04-01T00:34:55+5:30

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मंत्रपठण, देवदेवतांचे पूजन, धार्मिक कुलाचार हे पौरोहित्याचे अधिकार बहुजनांना बहाल करणारे ...

Dnyanganga of 'Bahujan Purohits' 'Shahu Vaidik' | बहुजन पुरोहितांची ज्ञानगंगा ‘शाहू वैदिक’

बहुजन पुरोहितांची ज्ञानगंगा ‘शाहू वैदिक’

Next

इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मंत्रपठण, देवदेवतांचे पूजन, धार्मिक कुलाचार हे पौरोहित्याचे अधिकार बहुजनांना बहाल करणारे श्री शाहू वैदिक विद्यालय म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी उभारलेल्या चळवळीचा पाया आहे. शताब्दीच्या उंबरठ्यावर असलेली आणि अठरापगड जातिधर्मांतील लोकांना धार्मिक शिक्षण देणारी ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील एकमेव संस्था आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनात अग्निदिव्य घडवून आणलेल्या वेदोक्त प्रकरणाने त्यांच्या विचारांना कलाटणी दिली. बहुजनांसाठी देवतांच्या आराधनेची दारे खुली करण्यासाठी त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. सुरुवातीला त्यांनी जगद्गुरू हा आपल्याच समाजातील असावा, या उद्देशाने संस्थानच्या दक्षिण भागातील पाटगाव येथे क्षात्र जगद्गुरू पीठाची स्थापना केली. राजवाड्यातील देवदेवतांच्या व पूर्वजांच्या समाधींच्या पूजा बहुजन पुरोहितांकडून सुरू केल्या व वाडी-रत्नागिरी येथील जोतिबा देवस्थानातही बहुजन गुरव पुजारी नेमले.
बहुजन समाजात पुरोहित तयार व्हावेत यासाठी त्यांनी ६ जुलै १९२० ला शिवाजी क्षत्रिय वैदिक पाठशाळा सुरू केली. त्या काळी १४ विद्यार्थ्यांनी सुरू झालेल्या या संस्थेतील विद्यार्थ्यांची संख्या वर्षाच्या शेवटी ६२ झाली. अठरापगड जातिधर्मांतील मुले येथे धार्मिक ज्ञान घेऊ लागली. पुढे ६ मे १९२२ रोजी शाहू महाराजांचे निधन झाले व ७ मे रोजी पंचगंगा तीरावर महाराणी लक्ष्मीबाईसाहेब व नूतन छत्रपती राजाराम महाराज यांनी या विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून महाराजांचे अंत्यसंस्कार करवून घेतले. त्या काळी विद्यालयातर्फे छत्रपती पंचांग निघे. शाहू महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांनी या स्कूलचे नाव बदलून ‘श्री शाहू वैदिक विद्यालय’ असे ठेवले. याचीच एक शाखा जोतिबा येथे आहे. छत्रपती शहाजी महाराजांपर्यंत राजाश्रय असलेली ही संस्था आता स्वबळावर चालविली जाते.
या वास्तूची काही वर्षांपूर्वी फारच दयनीय अवस्था होती. फरशा नव्हत्या, कौलारू छप्पर गळत होते. ग्रंथसंपदा नष्ट झाली; पण विश्वस्तांनी संस्थेच्या रकमेतून त्याची डागडुजी करून घेतली. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची साक्ष देणाऱ्या आणि शताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या या संस्थेच्या कार्यपद्धतीत काळानुरूप बदल होणे अपेक्षित आहे. एकेकाळी मोठा नावलौकिक असलेल्या या विद्यालयाची देखणी इमारत, विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा यासाठी विशेष प्रयत्न, गतवैभव मिळवणे हे विद्यालयापुढील आव्हान आहे.

मराठा इन्फंट्रीमध्ये निवड : या विद्यालयातून आजवर चार हजारांहून अधिक पुरोहित तयार झाले. काही वर्षांपूर्वीपर्यंत येथील विद्यार्थ्यांना दक्षिण काशी येथील वैदिक विद्यालयांप्रमाणेच सैन्यदलांमध्ये पंडित म्हणून भरती केले जात होते. पुढे ही भरती बंद झाली. मराठा इन्फंट्रीमध्ये शाहू वैदिक स्कूलचे प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यालाच पंडित म्हणून भरती केले जात होते. विद्यालयातील पाच ते सहा विद्यार्थ्यांची सैन्यदलांमध्ये वर्णी लागली आहे.
विद्यालयाची
कार्यकारिणी अशी
अध्यक्ष : किशोर तावडे, उपाध्यक्ष : विजयसिंह माने, सचिव : विक्रमसिंह यादव, राजोपाध्ये : बाळकृष्ण दादर्णे. विधी सल्लागार : राजेंद्र चव्हाण, सदस्य : इंद्रसेन जाधव, राजेंद्र दळवी, मनोज जाधव, नंदकुमार पोवार, बाजीराव चव्हाण, शांताराम घोटणे.

पगारी पुजारींत समावेश, अभ्यासक्रमात बदल
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचा निर्णय झाल्यानंतर विद्यालयात विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात येथे प्रात:संध्या, देवपूजा, पुरुषसूक्त स्तोत्रपाठ, विवाहविधी, उपनयन, श्रावणी, अंत्येष्टविधी, वास्तुशांती दत्तविधान, राज्याभिषेक, ज्योतिष, पंचांग अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाते. आता अंबाबाईच्या धार्मिक विधी, दुर्गासप्तशतीसारखे मंत्रपठण या अभ्यासक्रमांचा त्यात समावेश केला आहे. ‘देवस्थान’ने घेतलेल्या मुलाखतीत बहुतांश उमेदवार शाहू वैदिक स्कूलचेच होते.
शाहू महाराजांवरील श्रद्धा, चळवळ
हे विद्यालय म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी समतेसाठी उभारलेल्या आणि शंभराव्या वर्षाच्या उंबरठ्यावरही प्रवाही राहिलेल्या चळवळीची जिवंत साक्ष आहे. याची मूळ इमारत मंगळवार पेठेत कैलासगडची स्वारी मंदिर परिसरात होती. पुढे हे विद्यालय बिंदू चौकातील इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. तीन हजार चौरस फूट असलेल्या या जागेवरही महापालिकेने केएमटीचे आरक्षण टाकले; पण कोल्हापूरकरांनी व्यापक आंदोलन उभारून हे आरक्षण रद्द करायला भाग पाडले. आता त्याच्या विकासासाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: Dnyanganga of 'Bahujan Purohits' 'Shahu Vaidik'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.