कोल्हापुरातील आठ पिढ्यांचे ज्ञानपीठ
By admin | Published: January 18, 2016 12:17 AM2016-01-18T00:17:42+5:302016-01-18T00:30:12+5:30
करवीर नगर वाचन मंदिर : शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल; दुर्मीळ ग्रंथांसह १ लाख २६ हजार पुस्तके--लोकमतसंगे जाणून घेऊ
भारत चव्हाण -- कोल्हापूर करवीर नगर वाचन मंदिर म्हणजे शतकोत्तर हीरकमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असणारे कोल्हापुरातील एक ज्ञानपीठ. कोल्हापूरच्या साहित्यिक, सांस्कृतिक जडणघडणीत या ज्ञानपीठाने दिलेले योगदान केवळ अतुलनीयच नाही तर अविस्मरणीयही आहे. या ग्रंथालयाने कोल्हापूरच्या तब्बल आठ पिढ्यांचे मानसिक व बौद्धिक भरणपोषण केले आहे; म्हणूनच ‘कनवा’ म्हणजे कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहे. या संस्थेशी शहरातील प्रत्येक कुटुंबाचा, व्यक्तीचा संबंध आलेला आहे. हे ग्रंथालय कोल्हापूरची ओळख आहे.
इतिहासप्रसिद्ध करवीर संस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज (तिसरे) ऊर्फ बाबामहाराज यांच्या कारकिर्दीत त्यांच्याच मदतीतून ‘कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी’ या संस्थेची स्थापना दि. १५ जून १८५० रोजी त्यावेळच्या पोलिटिकल सुपरिटेंडेंट कर्नल एच. एल. अॅँडरसन या विद्यापे्रमी अधिकाऱ्याने केली. त्यांनी रविवारवाड्यात सार्वजनिक सभा बोलावून संस्था स्थापन करण्याचा उद्देश व त्यापासून होणारे फायदे यांचे निवेदन केले. त्यानंतर जागच्या जागी पाच हजार रुपयांचा निधी जमा झाला. त्यांपैकी एक हजार रुपये करवीर सरकारने दिले. ही रक्कम जमा झाल्यानंतर २५०८ रुपये ८ पैसे खर्च करून लायब्ररीची इमारत बांधली; तर १०५० रुपये १० पैशांची पुस्तके व ३२ रुपये ९ पैशांचे इतर साहित्य खरेदी केले. स्थापनेवेळी वर्गणीदारांची संख्या १७ होती, तर वार्षिक उत्पन्न १५ रुपये होते. पुस्तकांची संख्या ४४२ इतकी होती. आज १६५ वर्षांनंतर ही वर्गणीदारांची संख्या चार हजारांहून अधिक, तर १ लाख २६ हजारांहून अधिक पुस्तके आहेत. या आकडेवारीवरून आपणाला संस्थेचा कार्यविस्तार लक्षात येतो.
आॅक्टोबर १८९२ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी कोल्हापूरला भेट दिली तेव्हा त्यांनी आवर्जून या ग्रंथालयाच्या व्यासपीठावरून जनतेशी संवाद साधला होता. १९३३ साली १७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोल्हापुरात भरले होते, त्याचे यजमानपद करवीर नगर वाचन मंदिराकडेच होते. भारतात सार्वजनिक वाचनालयासाठीचा पहिला कायदा कोल्हापूर संस्थानने १९४४ मध्ये आणला. त्याची अंमलबजावणी ‘कनवा’मधून झाली. संस्थेने ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कै. वि. स. खांडेकर यांच्या स्मृती, व्याख्यानमालेच्या स्वरूपात जतन करण्यासाठी १९८१ पासून त्यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरू आहे. हजारो नामवंत व्यक्तींनी या व्यासपीठावर आपले विचार व्यक्त केले आहेत. त्याशिवाय शालेय विद्यार्थ्यांच्या सर्र्वांगीण विकाससाठी वक्तृत्व स्पर्धा, महिलांसाठी चर्चासत्रे आयोजित करून त्यांच्या कर्तृत्वास प्रोत्साहन देण्याचे काम या वाचनालयाने केले आहे.
संस्थेकडे असलेल्या १८६७ पासूनच्या दस्तऐवजांचे स्कॅनिंग करण्यात आले असून, १९०० सालपूर्व मराठी नाटके, शिळापे्रसवर छापलेले ग्रंथही संस्थेकडे आहेत. सुमारे ३००० ग्रंथांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, उर्वरित ग्रंथांचे पुढील टप्प्यात करण्याचा मानस आहे. वाचकांना ग्रंथालयात मुक्तद्वार प्रवेश योजना राबविली जाते. सभासदांना थेट पुस्तकांच्या कपाटापर्यंत प्रवेश देऊन त्यांना आवडीची पुस्तके घेता येतात.
वाचनालयातील नियतकालिके
मासिके / त्रैमासिके : श्री व सौ, अमृत, आरती, प्रीमियर, उत्तम कथा, कल्याण, किर्लोस्कर, गृहशोभिका, चारचौघी, तनिष्का, लोकराज्य, धर्मभास्कर, नया ज्ञानोदय, प्रसाद, मेहता मराठी ग्रंथजगत, चाणक्य मंडल, प्रतियोगिता दर्पण, माहेर, मेनका, रोहिणी, ललित, वसंत, व्यापारी मित्र, सत्याग्रही, साहित्यसूची, अंधश्रद्धा निर्मूलन, स्पर्धा परीक्षा, स्त्री, इंडियन लिटरेचर (इंग्रजी), आदिमाता, ऋषिप्रसाद, ग्राहकदिन, मनशक्ती, अंतर्नाद, ग्रहांकित, प्रज्योत, भारतीय कुस्ती, आंदोलन, कृषिपणन, समकालीन भारतीय साहित्य, कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्णू, रुची, आलोचना, नवभारत, आदी. दैनिके - लोकमत, पुढारी, सकाळ, तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स, सम्राट, संध्यानंद, केसरी, सनातन चिंतन, सामना, राष्ट्रगीत, लोकसत्ता, नवाकाळ, महासत्ता, लोकमत समाचार, टाइम्स आॅफ इंडिया, अॅग्रो, इकॉनॉमिक्स टाइम्स, ललकार, सनातन प्रभात, क्रांतिसिंह, इंडियन एक्स्प्रेस, पुण्यनगरी, युवकांचा नवा महाराष्ट्र, आदी.
साप्ताहिके : चित्रलेखा, नोकरी संदर्भ, मार्मिक, एम्प्लॉयमेंट न्यूज, लोकप्रभा, साधना, विवेक, स्पोर्टस् स्टार, दि विक, आउटलुक, इंडिया टुडे (इंग्रजी), इंडिया टुडे (हिंंदी), साप्ताहिक सकाळ, महाराष्ट्र शासन राजपत्र, आॅर्गनायझर, महालक्ष्मी केदार अर्पण, आदी.
पाक्षिके : चंपक, फ्रंटलाइन, फिल्मफेअर, फेमिना, स्पर्शज्ञान (ब्रेल) बिझनेस वर्ल्ड, सांस्कृतिक वार्तापत्र.
1करवीर नगर वाचन मंदिराचे उपक्रम
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : ‘कनवा’तर्फे स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन व अभ्यासिका सुरू केली आहे. यूपीएससी व एमपीएससी परीक्षांना जे विद्यार्थी बसतात, त्यांच्यासाठी संस्थेचा हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता विद्यार्थ्यांना सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत अभ्यासिका सुरू ठेवली जाते. त्यांना सर्व प्रकारची पुस्तके, सुविधा, ओळखपत्रेही दिली जातात. सध्या १२० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेतात. त्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा आहे. विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट अशी की, या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या ४० हून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळाली. या उपक्रमास मिळत असणारा वाढता प्रतिसाद पाहता जागा अपुरी पडत असल्याने नजीकच्याच मेन राजाराम हायस्कूलमधील जागा भाड्याने घेण्यात आली आहे.
2 वाचनकट्टा - प्रकाशित होणाऱ्या चांगल्या पुस्तकांवर वाङ्मयीन चर्चा घडवून आणण्याच्या हेतूने ‘वाचनकट्टा’ नावाचा उपक्रम संस्थेने सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्या-त्या महिन्यात प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर चर्चा घडवून आणली जाते. संस्थेच्या सभासदांना त्याकरिता निमंत्रित करण्यात येते. त्यावर सभासद आपली मतं मांडतात. पुस्तकांची माहिती कळते.
3 ग्रंथप्रदर्शने - जुन्या दुर्मीळ पुस्तकांची, हस्तलिखितांची, ग्रंथांची प्रदर्शने भरविली जातात. ज्या लेखकाची जन्मशताब्दी साजरी होत असते, अशा शताब्दी लेखकांच्या साहित्याचे प्रदर्शन भरविले जाते. वाचकांकडून दुर्लक्षित राहिलेली, अस्पर्शित पुस्तके निवडून काढून त्यांचेही प्रदर्शन भरविले जाते.
संस्थेला मिळालेले पुरस्कार
संस्थेच्या कार्याची दखल घेऊन तिला अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची यादी मोठी असल्याने ती येथे देणे अशक्य आहे; परंतु राज्य सरकारचा डॉ. ‘बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २००१’ व कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचा ‘उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार अ वर्ग’ या दोन पुरस्कारांचा आवर्जून उल्लेख केला जातो.
सभासदांना घरबसल्या पुस्तकांची निवड करून ती वाचता यावीत या हेतूने संस्था ई-लायब्ररीला प्राधान्य देत आहे. ग्रंथसंपदा घराघरांपर्यंत पोहोचविणे आणि वाचन संस्कृती वाढविण्यासाठी संस्था प्रयत्न करीत आहे. आम्ही एक प्रदर्शन हॉल उभारणार आहोत. ग्रंथालयात नवीन फोल्डिंगची कपाटे लवकरच घेणार आहोत.
- अनिल वेल्हाळ, कार्याध्यक्ष