कोरोनाला हरवण्यासाठी गणेशोत्सव साधेपणाने करा- संदीप कोळेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:14+5:302021-09-07T04:29:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, संभाव्य तिसरी लाट थोपवून कोरोनाला कायमचे हरवण्यासाठी गणेशोत्सव ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, संभाव्य तिसरी लाट थोपवून कोरोनाला कायमचे हरवण्यासाठी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, असे आवाहन करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी केले.
फुलेवाडी, बालिंगे परिसरातील तरुण मंडळ पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली, यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बालिंगे सरपंच मयूर जांभळे होते. या वेळी दोनवडे, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, जीवबा नाना पार्क आदी परिसरातील १२० हून अधिक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक कोळेकर म्हणाले की, कोरोनाचे संकट साधे नाही, आपण गाफील राहिलो तर त्याचा उद्रेक कशा पद्धतीने होतो, हे आपण दोन्ही लाटांमध्ये पाहिले आहे. करवीर तालुक्यातील तरुण मंडळांनी आतापर्यंत अनेक आदर्श जिल्ह्यासमोर ठेवले आहेत. गणेशोत्सव साधेपणाने व शिस्तबद्ध पध्दतीने साजरे करून वेगळेपणा जपा. सरपंच मयूर जांभळे म्हणाले की, बालिंगे परिसरातील तरुण मंडळांची वाटचाल सामाजिक जाणिवेतून सुरू असून पोलीस नियमावलीनुसारच गणेशोत्सव साजरा केला जाईल. यावेळी बालिंगेच्या पोलीस पाटील अर्चना पाटील, शिंगणापूरचे सरपंच प्रकाश रोटे, रिंकू देसाई, धनंजय ढेंगे, विजय तायशेटे, नंदकुमार जांभळे, नंदकुमार गाडे, उत्तम गायकवाड, अमृत दिवसे, विजय जांभळे, संतोष जाधव आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : फुलेवाडी, बालिंगे परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अर्चना पाटील, मयूर जांभळे, प्रकाश रोटे, रिंकू देसाई उपस्थित होते. (फाेटो-०६०९२०२१-कोल-फुलेवाडी)